
आधीच कमी प्रवासी संख्या, त्यात वारंवारच्या तांत्रिक बिघाडाचे ग्रहण लागल्याने बंद केलेल्या मोनोरेलची सेवा पुन्हा सुरू कधी होणार, याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. जवळपास अडीच महिन्यांपासून मोनोरेलची सेवा बंद आहे. सध्या मोनोच्या ट्रकवर नवीन दहा गाडय़ांच्या चाचण्या सुरू आहेत. सेवा पूर्ववत सुरू करण्याबाबत महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशनकडे उत्तर नसल्याने मोनोरेलचे नियमित प्रवाशी संभ्रमात सापडले आहेत.
11 वर्षांपूर्वी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालेल्या मोनोरेलच्या सेवेला महायुती सरकारच्या काळात तांत्रिक बिघाडाचे ग्रहण लागले. गाडय़ांची योग्यरित्या देखभाल ठेवली न गेल्याने ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये लागोपाठ मोनोरेलमध्ये बिघाड झाला आणि प्रवाशी सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशनचे अपयश चव्हाटय़ावर आले. त्यानंतर मोनोरेची सेवा अचानक बंद केली. ही सेवा दोन महिन्यांनंतर पूर्वपदावर येण्याची अपेक्षा होती. मात्र गेल्या महिन्यात चाचणी दरम्यान नव्या गाडीचा एक डबा हवेत उडून दुसऱया बीमवर आदळला होता. त्यामुळे मोनोरेलच्या पुनरागमनाची अनिश्चितता वाढली आहे. याबाबत महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशनच्या वरिष्ठ अधिकाऱयांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रवाशी सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत माहिती देण्यास असमर्थता दर्शवली. सध्या नव्या दहा गाडय़ांच्या चाचण्या केल्या जात आहेत. मात्र सेवा कधी सुरू होईल हे निश्चित सांगू शकत नसल्याचे उत्तर संबंधित वरिष्ठ अधिकाऱयाने दिले.
मोनोच्या हेल्पलाईनवर प्रवाशांचे वारंवार कॉल्स
मोनोरेलची सेवा बंद झाल्यापासून चेंबूर, वडाळा परिसरातील प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली आहे. नियमित प्रवाशांना हार्बर, मध्य रेल्वेचा वळसा घालून इच्छित स्थळी जावे लागत आहे. प्रवाशी सध्या महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशनच्या हेल्पलाईनवर फोन कॉल्स करून मोनोरेलची सेवा पूर्ववत कधी सुरू होणार, याबाबत वारंवार विचारणा करीत आहेत. एमएमआरडीए आणि महामुंबई मेट्रोच्या प्रशासनाच्या उदासिनतेवर प्रवाशी नाराजी व्यक्त करीत आहेत.

























































