
नगरपालिका, नगरपंचायतीच्या मतदानादरम्यान राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यानीच जोरादार राडा घालत निवडणुकीचा अक्षरशः खेळखंडोबा केला. बोगस मतदान करण्यावरून भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यानी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आमने-सामने आले. सत्तापक्षातीलच कार्यकर्त्यानीच एकमेकांच्या अंगावर धावून जात हाणामारी केल्याने. मतदान केंद्रांबाहेर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
बीडमध्ये दगड फेक; गेवराईत जोरदार राडा
गेवराईत पंडित आणि पवार गटात हाणामाऱया झाल्या. जमावाने गाडय़ांची तोडफोड केली. माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांना भाजप कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. बीड शहरात शाहूनगर भागातही मतदान सुरू असताना दगडफेकीची घटना घडली. परळीत नेहमीप्रमाणे बोगस मतदान करून घेण्यात आले. यासंदर्भात धनंजय मुंडे यांच्या विरोधात राजाभाऊ फड यांनी तक्रार केली.
मंत्री रक्षा खडसे यांची पोलिसांशी बाचाबाची
जळगाव जिह्यातील मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय राजयमंत्री रक्षा खडसे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. मतदान केंद्रावर भाजपच्या उमेदवाराला अडवल्याच्या कारणातून रक्षा खडसे पोलिसांवर संतापल्या. या दरम्यान दोघांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक झाली. दुसरीकडे, आमदार चंद्रकांत पाटील यांनी बोगस मतदानाचा गंभीर आरोप केला. या आरोपावरून देखील मतदान केंद्राबाहेर राडा झाल्याचे पाहायला मिळाले.
दिवसभरात आचारसंहिता भंगाच्या 15 तक्रारी
नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या मतदानात आज दिवसभरात आचारसंहितेचा भंग झाल्याच्या एकूण 15 तक्रारी दाखल झाल्या आहेत. निवडणूक आयोगाचे अधिकारी दिवसभर सर्व माध्यमांवर लक्ष ठेवून असतात. त्यामाध्यमातून येणारे व्हिडीओ, पोस्ट, वक्तव्ये यांच्यावर आयोगाचे बारीक लक्ष असते. यामध्ये आचारसंहितेचा भंग झाल्याचे निदर्शनास आले तर आयोग स्वतःहून दखल घेतो आणि तक्रार दाखल करतो. आतापर्यंत पंचवीसहून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत.
येवल्यात अजित पवार-शिंदे गटात राडा
येवल्यातील सहस्रार्जुन मंगल कार्यालय मतदान केंद्राबाहेर अजित पवार गट आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. मतदान केंद्रात ये-जा करण्यावरून झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर थेट हाणामारीत झाले.
मनमाडमध्ये भाजप–शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले
मनमाडमध्ये नेहरू भवन मतदान केंद्राजवळ भाजप आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. प्रभाग क्रमांक 11 मध्ये बोगस मतदान होत असल्याचा आरोप भाजप उमेदवाराकडून करण्यात आला. यावरून दोन्ही बाजुच्या कार्यककर्ते धक्काबुक्की करत एकमेकांच्या अंगावर धावून गेले.
तासगावमध्ये दोन गटात धक्काबुक्की
तासगाव नगर परिषदेच्या मतदानावेळी एका बूथवर बोगस मतदान होत असल्याचा आक्षेप राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या बूथ प्रतिनिधींनी घेतला. यामुळे माजी खासदार संजय पाटील समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेर गोंधळ घातला. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या अंगावर धावत जात धक्काबुक्की केली.
सोनपेठमध्ये आजी-माजी आमदार भिडले
सोनपेठ नगरपालिकेसाठी मतदान सुरू असतानाच आमदार राजेश विटेकर आणि माजी आमदार व्यंकट पाटील एकमेकांना भिडले. दोन्ही गट आमनेसामने येताच हमरीतुमरीवर आले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही गटांना बाजूला काढले.
जतमध्ये भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांत वादावादी
जत नगरपरिषदेच्या मतदानादरम्यान शिवाजी पेठ येथील मतदान केंद्रावर भाजप कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात जोरदार वादावादी झाली. भाजपच्या उमेदवार प्रणिता यादव यांना मतदान केंद्राबाहेर काढण्यावरून हा वाद सुरू झाला, ज्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलीस उपअधीक्षक सचिन थोरबोले यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
रत्नपूरमध्ये उमेदवारच मतदारांना घेऊन जात होता…
छत्रपती संभाजीनगरच्या रत्नपूर येथे एका मतदान केंद्रावर उमेदवारच मतदाराला मतदान करण्यासाठी थेट केंद्रात घेऊन जात असल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यासंदर्भात इतर उमेदवारांनी आक्षेप घेतला. निवडणूक अधिकारी इतर उमेदवारांच्या बाबतीत पक्षपात करत असल्याचाही आरोप करण्यात आला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला.
जळगावात मतदान
कर्मचारीच सांगत होते कमळाचे बटण दाबा
जळगाव जिह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव इथे मतदान केंद्रावरील कर्मचारी मतदारांना कमळाचे बटण दाबा असे सांगत असल्याच्या प्रकार घडला. वरणगाव नगरपालिकेसाठी मतदान सुरू असताना, प्रभाग क्रमांक दहा मधील सिद्धेश्वर नगर येथील बूथवरती हा प्रकार घडला.
हिंगोलीत भाजप-शिंदे गटामध्ये राडा
हिंगोलीत मतदानाची वेळ संपल्यानंतर मंगळवारा भागात भारतीय विद्यामंदीर शाळेच्या केंद्रावर शिंदे गटाचे कार्यकर्ते बोगस मतदान करून घेत असल्याचे कळताच भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी तिथे धाव घेतली. आमदार मुटकुळे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. गद्दार आमदार संतोष बांगरही धावतपळत केंद्रावर आले. पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना तंबी देत परिस्थिती नियंत्रणात आणली.
भोरमध्ये वादावादी;
मतदान यंत्राची पूजा
भोर नगरपरिषदेमध्ये भाजप आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. कार्यकर्त्यांची पोलिसांबरोबरही बाचाबची झाली. मतदान केंद्र क्र. 9 मधील संत गाडगे महाराज शाळेतील केंद्रावर अजित पवार गटाचे उमेदवार केदार देशपांडे यांच्या पत्नीने ईव्हीएम मशीनची हळद-कुंकू वाहून पूजा केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निवडणूक प्रशासनाने या केंद्रावरील मतदान केंद्र अधिकाऱयाची तत्काळ बदली केली. नवीन केंद्र अधिकारी नियुक्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
आजी–माजी आमदारांचे कार्यकर्ते भिडले
पुणे जिह्यात भोरमध्ये मतदान केंद्राबाहेर आमदार शंकर मांडेकर आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. शंकर मांडेकर यांचे मुळशीतील कार्यकर्ते तर संग्राम थोपटे यांचे भोरमधील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आहे. पोलिसांनी मध्यस्थी करताच वातावरण शांत केले.
लोहय़ात मतदान सुरू असतानाच भाजपचा उमेदवार पळाला
नांदेड जिल्हय़ात भाजपला लागलेली गळती मतदानाच्या वेळीही सुरू राहिली. लोहा नगरपालिकेसाठी मतदान सुरू असतानाच प्रभाग क्रमांक 10मधील भाजपचे उमेदवार संजय चव्हाण यांनी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे भाजपची चांगलीच नाचक्की झाली.
जामनेरात बोगस मतदारांना पकडले
जामनेर नगरपरिषद निकडणुकीसाठी मंगळकारी मतदान प्रक्रिया सुरू असताना, प्रभाग क्रमांक 10 मध्ये बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱया एका तरुणासह एका मुलीला राष्ट्रकादी काँग्रेस शरद पकार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पकडले आहे. दोघांकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुळजापुरात महिलेचा हृदयविकाराने मृत्यू
तुळजापुरात प्रभाग क्रमांक 9मध्ये एका केंद्रावर मतदान करण्यासाठी आलेल्या राजश्री सदाशिव भोसले या महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मतदानासाठी रांगेत उभी असतानाच तिला चक्कर आली. त्यानंतर तिला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून महिलेला मृत घोषित केले. या घटनेमुळे मतदान केंद्रावर काही काळ तणाव निर्माण झाला होता.




























































