आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाने बोगस मतदाराला पळवले

बुलढाणा नगरपालिकेच्या मतदानादरम्यान मयत झालेल्या तसेच बाहेरगावी गेलेल्या मतदारांच्या नावाने मतदान करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले आहे. शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्याला बोगस मतदान करताना नागरिकांनी रंगेहाथ पकडले आणि चोप दिला. परंतु आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाने पोलीस कर्मचाऱयाचा हात धरून ठेवत या बोगस मतदाराला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप भाजपने केला आहे.

बुलढाणा शहरातील गांधी प्राथमिक शाळा आणि आयटीआय मतदान बोगस ओळखपत्र बनवून मतदान करून घेतल्याचे समोर आले आहे. भाजप बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी याप्रकरणी थेट निवडणूक आयुक्तांकडे तक्रार केली आहे. यामध्ये त्यांनी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा पुत्र आणि उमेदवार कुणाल गायकवाड तसेच आमदारांचा पुतण्या श्रीकांत गायकवाड यांनी बोगस मतदान करणाऱयास पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी दोषींवर तातडीने कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी भाजपने केली आहे.