
हिंदुस्थानी रुपया आंतरराष्ट्रीय व्यापारात बुधवारी मोठ्या प्रमाणात घसरला आणि डॉलरच्या तुलनेत प्रथमच ९० चा टप्पा ओलांडून गेला आहे.
रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ९०.१३ या नव्या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. यापूर्वीचा ८९.९४७५ चा नीचांक अवघ्या एका दिवसापूर्वी मोडला होता.
व्यापारातील शिथीलता आणि पोर्टफोलिओ प्रवाहामुळे तसेच हिंदुस्थान-अमेरिका व्यापार करारावरील वाढत्या अनिश्चिततेमुळे रुपयामध्ये ही घसरण झाल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत. या घटकांमुळे संपूर्ण सत्रात रुपयावर सतत दबाव राहिला.
रुपयाच्या या तीव्र घसरणीचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारांवरही झाला. गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याने निफ्टी निर्देशांक २६,००० च्या खाली गेला. तसेच, रुपया कमकुवत झाल्यामुळे महागाई आणि विदेशी गुंतवणूकदारांच्या हालचालींबाबत चिंता वाढल्याने शेअर बाजारात देखील सुरुवातीच्या व्यवहारात जवळपास २०० अंकांची घसरण पाहायला मिळाली.
बाजारातील विश्लेषकांचे मत
विश्लेषकांनी सांगितले की, रुपयामध्ये स्थिरता येण्याची चिन्हे आणि हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराबाबत स्पष्टता याकडे उद्योग जगाचे लक्ष असल्याने बाजारातील वातावरण तणावपूर्ण राहिले.
‘हिंदुस्थान-अमेरिका व्यापार करार प्रत्यक्षात आल्यास रुपयाची घसरण थांबेल आणि तो पुन्हा वाढू शकेल. या महिन्यात हे होण्याची शक्यता आहे. मात्र, या कराराचा भाग म्हणून हिंदुस्थानवर लादल्या जाणाऱ्या शुल्काच्या (Tariffs) तपशीलावर बरेच काही अवलंबून असेल’, असे विश्लेषकांनी सांगितले.
दरम्यान, मुंबई शेअर बाजार बुधवारी संथ गतीने उघडला आणि सुरुवातीच्या व्यवहारात दोन्ही बेंचमार्क निर्देशांकांनी किंचित हालचाल दर्शविली. निर्देशांक केवळ १२ अंकांनी वाढून ८५,१५१ वर पोहोचला, तर निफ्टी १८ अंकांनी घसरून २६,०१४ वर आला.
सकाळच्या सत्रात HUL, टायटन (Titan), टाटा मोटर्स पीव्ही (Tata Motors PV), एनटीपीसी (NTPC), बीईएल (BEL), ट्रेंट (Trent), बजाज फिनसर्व्ह (Bajaj Finserv), कोटक बँक (Kotak Bank), अल्ट्राटेक सिमेंट (Ultratech Cement), मारुती सुझुकी (Maruti Suzuki), एल अँड टी (L&T), पॉवर ग्रीड (Power Grid), आणि आयटीसी (ITC) यांचे शेअर्स प्रमुख घसरण दर्शवणाऱ्यांमध्ये होते.
विश्लेषकांनी स्पष्ट केले, ‘बाजारात चालू असलेल्या संथ घसरणीला कारणीभूत असलेली एक खरी चिंता म्हणजे रुपयाचे सततचे अवमूल्यन आणि RBI रुपयाला आधार देण्यासाठी हस्तक्षेप करत नसल्यामुळे पुढील घसरणीची भीती. वाढत्या कॉर्पोरेट कमाई आणि जीडीपी (GDP) वाढीमध्ये जोरदार सुधारणा असे मूलभूत घटक असूनही, या चिंतेमुळे FII (विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार) विक्री करण्यास भाग पाडत आहेत’.



























































