पुण्यातील जमीन घोटाळ्याप्रकरणी अखेर शीतल तेजवानी हिला अटक, पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीसाठी धोक्याची घंटा

मुंढव्यातील जमीन घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी शीतल किशनचंद तेजवानी हिला अखेर अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज दुपारी ही कारवाई केली. तेजवानी यांची अटक उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

तेजवानी हिने मुंढव्यातील 40 एकर महार वतनी जमीन बेकायदेशीररीत्या विकल्याचा आरोप आहे. त्यासाठी तिने पार्थ पवार, दिग्विजय पाटील यांच्या अमेडिया एंटरप्राइजेस एलएलपी कंपनीशी 300 कोटींचा व्यवहार केला. या जमिनीच्या 272 मालकांच्या वतीने ‘पॉवर ऑफ अॅटर्नी’ म्हणून तिने व्यवहार केला होता. प्रत्यक्षात ही जमीन राज्य सरकारची असून ती बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला भाडेकराराने देण्यात आली आहे. पोलिसांनी मागील महिन्यात दोन वेळा तेजवानी हिची चौकशी केली होती. खडक पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्या आधारे आज तिला अटक करण्यात आली. तिला गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. तेजवानी हिच्यासह पार्थ पवार यांचा बिझनेस पार्टनर दिग्विजय पाटील व निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले हे या प्रकरणात आरोपी आहेत. विक्री करारावर पार्थ पवार यांचे नाव नसल्याने त्यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आलेले नाही.

शीतल तेजवानीची पोलिसांशी हुज्जत

अटकेनंतर शीतल तेजवानीला पोलीस आयुक्तालयात आणले गेले. पोलिसांनी तिला गाडीतून उतरण्यास सांगितले. मात्र तिने उतरण्यास नकार दिला. पोलीस वारंवार तिला खाली यायला सांगत होते, पण ती ऐकत नव्हती. तिने पोलिसांशी हुज्जत घातली. चालत येणार नाही असे तिने सांगितले. तुम्हाला शॉर्टकटने घेऊन जाऊ असे पोलिसांनी सांगितले, तेव्हाच ती कारमधून उतरली.

अटक महत्त्वाची का?

मुंढवा जमीन व्यवहारात शीतल तेजवानीची भूमिका महत्त्वाची होती. तेजवानी हिनेच जमिनीच्या मूळ मालकांशी संपर्क साधला होता. सरकारच्या ताब्यात असलेली ही जमीन सोडवून घेण्यासाठी तिने कधीही रद्द न होणारी ‘पॉवर ऑफ अॅटर्नी’ बनवून घेतली. त्या बदल्यात मूळ मालकांपैकी कुणाला दोन हजार, कुणाला पाच हजार तर कुणाला 25 हजार दिले. हे सगळे करून झाल्यानंतर काही वर्षांनी तिने हुशारीने अमेडिया कंपनीशी संपर्क साधला. कागदपत्रांसह अनेक गोष्टी बेकायदेशीर करून तिने सरकारची व जमीन मालकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.