शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक करणारा अटकेत

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली वृद्ध मॅकेनिकल इंजिनिअर सल्लागाराची फसवणूक करणाऱयाला उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. वसीम शेख असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.

तक्रारदार वयोवृद्ध असून मार्च महिन्यात ते एका शेअर ट्रेडिंगबाबत माहिती देणाऱया व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जोडले गेले. एकाने त्यांना संपर्क करून लिंक पाठवली. त्या लिंकवर त्याने वैयक्तिक आणि बँक खात्याची माहिती भरली. त्यावर विश्वास ठेऊन त्याने 1 कोटी 35 लाख रुपयांची गुंतवणूक केली. गुंतवणूक केल्यावर त्यांना चांगला फायदा झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्याने काही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याना ती रक्कम काढता आली नाही. ती रक्कम काढण्यासाठी आणखी 70 लाख रुपये भरण्यास सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने उत्तर प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला. तपासा दरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वसीमला ताब्यात घेतले. त्याने सायबर ठगांना बँक खाती पुरवल्याचे तपासात समोर आले आहे. त्याला कमिशन म्हणून काही रक्कम मिळत होती.