
दहिसर पूर्व येथील शुक्ला कंपाऊंड येथे गेल्या 45 वर्षांपासून 400 रहिवाशी वास्तव्य करीत आहेत. या ठिकाणी गृह प्रकल्प उभारताना विकासकाने 1962 पूर्वीची कागदपत्रे असणाऱ्यांनाच घरे मिळतील अशी अट घातली आहे. विकासकाने घातलेली ही डेट ऑफ लाईन सरकारने बदलावी अशी मागणी शिवसेना नेते, आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यासंदर्भात नागपूर येथे होणाऱया हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडून आवाज उठवणार असल्याचे पत्रात नमूद केले आहे.
दहिसर पूर्व रावळपाडा येथील शुक्ला कंपाऊंड येथे 400 रहिवाशी वास्तव्य करीत असून यापैकी 200 रहिवाशी छोटे-मोठे लघुउद्योग करीत आपला उदरनिर्वाह करीत आहेत. या जागेचा मूळ मालक गोविंद पाटील यांनी ही जागा 1920 साली इकबाल मिरची व शेलाजी इन्फ्रास्ट्रक्चरचे बालक अशोक जैन यांना विकली. विकासक अशोक जैन यांनी येथे गृहप्रकल्प उभारताना झोपडीधारकांना 1962 पूर्वीचे कागदपत्रे मागितली असून पुरावे जमा करण्यास सांगितले आहेत.
याबाबत शिवसेना नेते, आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात प्रभू यांनी म्हटलेय, मुंबईसह महाराष्ट्रात महापालिका, राज्य शासन किंवा खासगी जागेवर गृहप्रकल्प उभारताना रहिवाशांकडे 2012 च्या अगोदरचे पुरावे मागितले जातात. परंतु रावळपाडा येथील शुक्ला कंपाऊंडमध्ये होणाऱया गृह प्रकल्पासाठी विकासक अशोक जैन हे स्वतःच्या फायद्यासाठी तेथील रहिवाशांना 1962 पूर्वीचे पुरावे देण्यास सांगत आहेत. याबाबत हिवाळी अधिवेशनात आपण लक्षवेधी मांडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

























































