
देशातील सर्व बँकांमध्ये सध्या 67000 कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम पडून आहे. म्हणजे या रकमेवर कुणी दावा केलेला नाही. जुनी खाती, विसरलेल्या एफडी, बंद पडलेली खाती, मॅच्युअर झालेले डिपॉझिट, जुने शेअर्स यांची ही रक्कम आहे. ती रक्कम आता त्यांच्या खऱ्या मालकांकडे पोचवायचे अभियान आरबीआयने सुरू केले आहे. अनक्लेम्ड रकमेपैकी 10 हजार कोटी रुपये आरबीआयने मालकांना परत केले आहेत.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की, मागील तीन वर्षांत बँकांनी अनक्लेम्ड रकमेपैकी 10,297 कोटी रुपये परत केले आहेत. या रकमेवर कित्येक वर्षे कुणी दावा केला नव्हता किंवा खाती निष्क्रिय झालेली होती. एप्रिल 2022 ते नोव्हेंबर 2025 पर्यंत 33 लाखांपेक्षा अधिक डॉर्मेट अकाऊंट्स पुन्हा सक्रिय करून त्यातील रक्कम खऱ्या मालकांना परत करण्यात आली आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विशेष राष्ट्रीय अभियान लाँच केले होते. ‘आपली कुजी, आपले अधिकार’ या तीन महिन्यांच्या देशव्यापी मोहिमेद्वारे अनक्लेम्ड धन खऱया मालकांकडे परत दिले जाणार असल्याचे निर्मला सीतारामन म्हणाल्या. बँक जमा, विमा पॉलिसी, भविष्य निधी किंवा शेअरसारख्या बेवारस रकमेचे खरे हक्कदार शोधून त्यांना परत देणे हे या मोहिमेचे उद्दीष्ट आहे.
कोणती रक्कम ‘अनक्लेम्ड’ मानली जाते?
दीर्घकाळ दावा न केल्यास बँक जमा आरबीआयकडे, तर शेअर किंवा विमा पॉलिसी सीबीआयकडून (सेबी) आयईपीएफमध्ये हस्तांतरित होतात. ही रक्कम एका निधी क्षेत्रातून दुसऱयात फक्त ‘वेटिंग रूम’प्रमाणे जाते. लोकांच्या मदतीसाठी आरबीआयने ‘उद्गम’ नावाचे डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. त्यावर ‘अनक्लेम्ड’ रक्कम जाणून घेऊ शकता. नाव, मोबाईल नंबर आणि जन्मतारीख टाकून ही माहिती मिळवता येते.






























































