परदेशात शिक्षण घेणे महागले! रुपयाच्या घसरगुंडीमुळे शैक्षणिक कर्जात वाढ, कुटुंबाचे बजेट कोलमडले

डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत आहे. रुपयाची घसरण झाल्यामुळे अर्थव्यवस्थेला फटका बसत आहे. परदेशात शिकणाऱया विद्यार्थ्यांवरही याचा परिणाम होत आहे. परदेशातील हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. डगमगणाऱ्या रुपयामुळे विद्यार्थ्यांची फी आणि शैक्षणिक कर्जामध्ये वाढ झाली आहे. अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनमध्ये राहणाऱया विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला जास्त बजेटची तरतूद करावी लागत आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपया 90 च्या खाली येऊन ऑल टाईम लो स्तरावर पोहोचला आहे. रुपया कमकुवत झाल्यामुळे कच्च्या तेलापासून इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत वस्तू महाग झाल्या आहेत. 2025 मध्ये खराब प्रदर्शन करणाऱ्या चलनात रुपयाचा समावेश झाला आहे. याचा परिणाम अमेरिका, ब्रिटन, इटली, जर्मनी आणि सिंगापूर येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिसून येत आहे. परदेशात राहण्याचा खर्च किंवा शैक्षणिक शुल्क लाखांच्या पार जाऊ शकते.

शैक्षणिक कर्जदेखील वाढू शकते. परदेशात शिक्षणासाठी जाणारे अधिकतर विद्यार्थी मध्यमवर्गीय कुटुंबातील असतात. ते शिष्यवृत्ती किंवा शैक्षणिक कर्ज काढून शिकायला जातात.

  • 2023 साली 8.95 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी, तर 2024 साली 7.6 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी परदेशात शिक्षणाचा निर्णय घेतला.
  • मागील आठ महिन्यांत डॉलरच्या तुलनेत रुपया 84 रुपयांवरून घसरून 90.12 वर पोहोचला आहे. चालू वर्षात रुपयाची डॉलरच्या तुलनेमध्ये विक्रमी घसरण सुरूच आहे. आजही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरच्या तुलनेत अक्षरशः धारातीर्थी पडला. त्यामुळे रुपया 90.43 वरती आला. काल रुपया 90.15 वरती बंद झाला होता. रुपयाची अभूतपूर्व घसरण झाल्याने अर्थव्यवस्थेलासुद्धा मोठा झटका बसला.