
सांगली जिह्यातील साखर कारखाने सुरू होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. मात्र, एकाही साखर कारखान्याने उसाचे बिल काढलेले नाही. त्याचबरोबर उसाचा उतारा कमी दाखवत कारखान्यांकडून गोलमाल केला जात असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी केला आहे.
शुगर केन कंट्रोल ऑर्डर 1966 च्या कायद्यानुसार ऊस तुटून गेल्यापासून 14 दिवसांच्या आत शेतकऱयांच्या खात्यावर साखर कारखान्यांनी बिल जमा करणे गरजेचे आहे; परंतु अद्यापही एकाही साखर कारखान्याने बिल जमा केलेले नाही. साखर कारखान्यांनी 3,500 रुपयांचा दिलेला शब्द पाळावा; अन्यथा शेतकरी स्वतःहून कोयताबंद आंदोलन करतील. सध्या सर्वच कारखान्याने गाळप क्षमता वाढविल्यामुळे तोडणी वाहतूक यंत्रणा प्रत्येक कारखान्याला पुरेशी नाही. त्यामुळे शेतकऱयांनीही ऊसतोडीसाठी गडबड करू नये. तसेच ऊसतोडणी वाहतुकीसाठी पैसे देऊ नयेत.
जो कारखाना 3,500 रुपये दर देणार आहे, त्याच कारखान्याला शेतकऱयांनी ऊस घालावा. सध्या सांगली जिह्यातून कोल्हापूर जिह्यातील कारखाने ऊस पळवत आहेत. जिह्यातील साखर कारखानदारांनी जाहीर केल्याप्रमाणे अद्यापही शेतकऱयांच्या खात्यावर पैसे जमा केलेले नाहीत. जर साखर कारखानदार मनमानी करणार असतील, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा कार्याध्यक्ष राजोबा यांनी दिला आहे.



























































