
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सुरू असलेली तीन सामन्यांची वनडे मालिका संपल्यानंतर रोहित शर्मा नावाच वादळ पुन्हा एकदा टी-20 क्रिकेटमध्ये धुडगूस घालण्यासाठी उत्सुक असल्याचं वृत्त समोर आलं आहे. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून यापूर्वीच निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे त्याची वेगवान आणि विस्फोटक फलंदाजी पाहण्याासाठी चाहत्यांचे डोळे सरसावले आहे. अशातच रोहित शर्माने सय्यद मुश्ताक अली ट्रॉपी टी-20 स्पर्धेत खेळण्याची इच्छा दर्शवली आहे.
Times Of India ने दिलेल्या वृत्तानुसार, टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सुरू असलेली वनडे मालिका पार पडल्यानंतर रोहित शर्माने देशांतर्गत सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धेच्या बाद फेरीत खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनला तशी माहिती त्याने दिली आहे. 29 जून 2024 रोजी टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा टी20 वर्ल्डकप 2024 च्या अंतिम सामन्यात पराभव केला आणि वर्ल्ड कप उंचावला. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला आणि त्याच दिवशी रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. जवळपास दीडवर्षांहून अधिक काळ रोहित शर्मा आयपीएलचे सामने वगळता टी-20 क्रिकेट खेळलेला नाही.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईचा समावेश एलिट ग्रुप ए मध्ये करण्यात आला आहे. शार्दुल ठाकुरच्या नेतृत्वात मुंबईच्या संघाने दमदार कामगिरी केली आहे. मुंबईने साखळी फेरीतील पाच पैकी चार सामन्यांमध्ये विजयी जल्लोष साजरा केला आहे. त्यामुळे मुंबईचा संघ सध्या चांगल्या फॉर्मात आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा मुंबईमध्ये सामील झाला तर मुंबईचा संघ आणखी मजबूत होईल. सध्या संघात अजिंक्य रहाणे, तुफान फॉर्मात असलेला आयुष म्हात्रे आणि सूर्यकुमार यादव या विस्फोटक फलंदाजांचा समावेश आहे.


























































