चौदाव्या वर्षीच क्रिकेट आणि इंटरनेटचा बादशहा

केवळ वयाच्या 14 व्या वर्षी क्रिकेटविश्वात खळबळ उडवणारा वैभव सूर्यवंशी आता फक्त मैदानावरच नव्हे, तर गुगलच्या सर्च इंजीनमध्येही अव्वल ठरला आहे. गुगल इयर इन सर्च 2025 अहवालानुसार वैभव सूर्यवंशी हा 2025 मध्ये हिंदुस्थानातील सर्वाधिक शोधला गेलेला क्रिकेटपटू ठरला आहे. आयपीएल, हिंदुस्थान ‘अ’ आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील त्याच्या स्पह्टक फलंदाजीमुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, त्याची माहिती जाणून घेण्यासाठी चाहत्यांनी गुगलचा आधार घेतला.

गुगलच्या सर्च यादीत अनेक दिग्गज आणि नवोदित खेळाडूंनी स्थान मिळवले असले तरी, यादीच्या शिखरावर सूर्यवंशीच विराजमान आहे. अवघ्या 12 व्या वर्षी रणजी ट्रॉफीत पदार्पण करून त्याने क्रिकेटजगताचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर 14 व्या वर्षी आयपीएलमध्ये उतरून शतक झळकवणारा तो सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला आणि इतिहासातही त्याने आपले नाव कोरले.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत (एसएमएटी)बिहारकडून खेळताना महाराष्ट्राविरुद्ध केलेली 58 चेंडूंत नाबाद 108 धावा ही खेळी तर त्याच्या कारकिर्दीचा सुवर्णक्षण ठरली. या खेळीसह तो एसएमएटी इतिहासातील सर्वात तरुण शतकवीर ठरला. वैभवप्रमाणे गुगलवर प्रियांश आर्य, अभिषेक शर्मा, शेख रशीद, जेमिमा रॉड्रिग्ज, आयुष म्हात्रे, स्मृती मानधना, करुण नायर, उर्विल पटेल, विघ्नेश पुथूर यांनाही शोधण्यात इंटरनेटप्रेमी आघाडीवर होते.