
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या हिंदुस्थानच्या दौऱ्यामध्ये अनेक महत्त्वाचे करार करण्यात आले. त्यात हिंदुस्थानातील नागरी अणुऊर्जा प्रकल्पांना रशिया मदत करणार असून देशातील सर्वात मोठय़ा कुडनकुलमसारख्या अणुऊर्जा प्रकल्पांना रशिया आण्विक इंधन पुरवणार आहे. रशियाची सरकारी कंपनी ‘रोसॅटम’ने आजच कुडनकुलमसाठी आण्विक इंधनाची खेप पाठविली आहे. याशिवाय अमेरिकेचा दबाव असला तरीही हिंदुस्थानला कोणत्याही अडचणीविना कच्च्या तेलाचा पुरवठा सुरूच ठेवणार, असे पुतीन यांनी स्पष्ट केले.
मोदी आणि पुतीन यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती दिली. आम्ही केवळ तेल आणि गॅसवर चर्चा करण्यासाठी हिंदुस्थानात आलेलो नाही. दोन्ही देशांमध्ये नव्या क्षेत्रात भागीदारी वाढावी आणि व्यापार वाढावा ही आमची इच्छा असल्याचे पुतीन यांनी स्पष्ट केले. दरम्यान, रशियाकडून लढाऊ विमाने खरेदी करण्याबाबत कोणत्याही संरक्षण कराराची घोषणा या दौऱयात झाली नाही. याबाबत बरीच चर्चा सुरू होती. मात्र, हिंदुस्थानला यापुढेही शस्त्रास्त्रs देत राहणार, असे पुतीन यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेच्या नाकावर टिच्चून तेलपुरवठा
अमेरिकेने हिंदुस्थानवर रशियाकडून तेलखरेदी न करण्यासाठी प्रचंड दबाव टाकला आहे. मात्र, कोणत्याही दबावाशिवाय हिंदुस्थानला इंधनपुरवठा करत राहू, असे पुतीन यांनी स्पष्ट केले. पुतीन यांनी हिंदुस्थानसोबत व्यापार वाढविण्यासाठी बेलारुसमार्गे थेट हिंदी महासागरातून हिंदुस्थानपर्यंत नव्या व्यापार मार्गाची घोषणा केली. यामुळे हिंदुस्थानच्या तेलपुरवठय़ात कोणतीही अडचण येणार नाही.
हिंदुस्थान-रशिया मैत्री ध्रुव ताऱ्यासारखी – मोदी
रशिया हा हिंदुस्थानचा सर्वात जवळच्या सहकाऱयांपैकी एक असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. हिंदुस्थान आणि रशियाची मैत्री ध्रुव ताऱयाप्रमाणे स्थिर आणि अढळ आहे. विश्वास हीच दोन्ही देशांमधील संबंधांची सर्वात मोठी ताकत असल्याचे मोदी म्हणाले.
दोन्ही देशांमध्ये व्यापार वाढविण्यास मोठी संधी – पुतीन
आम्ही हिंदुस्थानात केवळ तेल आणि गॅसची चर्चा किंवा व्यापारी करार करण्यासाठी आलेलो नाही. रशियाला हिंदुस्थानसोबत प्रत्येक क्षेत्रात नाते आणि व्यापार वाढवायचा आहे. दोन्ही देशांमध्ये नव्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढावे यासाठी प्रयत्न असल्याचे पुतीन म्हणाले.
7 विमाने आण्विक इंधन घेऊन येणार
रशियाची सरकारी अणुऊर्जा पंपनी रोसॅटमने पाठविलेले अणु इंधन गुरुवारीच हिंदुस्थानात दाखल झाले. एकूण सात विमाने अणु इंधन घेऊन हिंदुस्थानात दाखल होणार आहेत. याबाबत 2024 मध्येच करार झाला होता. पुतीन यांच्या हिंदुस्थान दौऱयात देशातील नागरी अणुऊर्जा प्रकल्पांना रशिया मदत करणार आहे. याबाबत गुरुवारी सामंजस्य करार करण्यात आला.
दोन्ही देशांमध्ये 19 करार
पुतीन यांच्या हिंदुस्थान दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये 19 करार करण्यात आले. दोन्ही देशांमधील व्यापार वाढविणे हा यामागील प्रमुख हेतू आहे. यात नागरी अणुऊर्जा प्रकल्पासाठी मदतीशिवाय रशिया हिंदुस्थानी नाविकांना बर्फाळ प्रदेशात जहाज चालविण्याचे प्रशिक्षण देणे, वैद्यकीय शिक्षण, दोन्ही देशांमध्ये पर्यटनाला चालना देणे तसेच महत्त्वपूर्ण खनिजांसदर्भातील करारांचा समावेश आहे. रशियन पर्यटकांना हिंदुस्थानात 100 दिवसांच्या विना व्हिसा वास्तव्य करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याच वेळी हिंदुस्थानच्या विद्यार्थ्यांना रशियामध्ये शिक्षण घेण्यासाठी रशियन एज्युकेशन एजन्सीचे पहिले कार्यालय उघण्यात आले आहे.
हे करार झाले
ऊर्जा सहकार्य
आरोग्यसेवा, वैद्यकीय शिक्षण सहकार्य
अन्न सुरक्षा
ध्रुवीय जहाज उत्पादन व सागरी सहकार्य
खत उत्पादन आणि पुरवठा
सहकार्य आणि स्थलांतर
पर्यटनविषयक सुविधा
युक्रेनवर गुळमुळीत
पंतप्रधान मोदींनी युव्रेन युद्धासंबंधी भूमिका मांडली. युव्रेन युद्धात आम्ही तटस्थ नसून शांततेच्या बाजूने आहोत, असे मोदी म्हणाले. दोन वर्षांपासून सुरू असलेले युद्ध थांबविण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. यावेळी मोदी-पुतीन चर्चेतून काही ठोस भूमिका घेतली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, मोदींनी अतिशय गुळमुळीत भूमिका घेतली.
काय ठरले…
- कोणत्याही दबावाशिवायहिंदुस्थानला इंधन पुरवठा.
- दहशतवादाविरोधात खाद्यांला खांदा लून लढत राहणार.
- रशियन्ससाठी 30 दिवसांचा मोफत ई-टुरिस्ट व्हिसा.
- रशिया हिंदुस्थानकडून होणाऱया आयातीत वाढ करणार.
राहुल गांधी, खरगेंना डिनरचे निमंत्रण नाही
पुतीन यांच्यासाठी राष्ट्रपती भवनात डिनर आयोजित करण्यात आले. मात्र, त्यात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना निमंत्रण देण्यात आले नाही. मात्र, काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांना निमंत्रण देण्यात आले होते व ते डिनरला उपस्थितही राहिले.






























































