Crime News- 10 तस्करांना अटक करत चार कोटींचे ड्रग्ज जप्त

अंमली पदार्थ विरोधी कक्षाने विविध ठिकाणी धडक कारवाई करत चार कोटी रुपये किंमतीचा ड्रग्ज साठा पकडला. या कारवाईत 10 ड्रग्ज तस्कराच्या मुसक्या आवळत पाच लाख 80 हजार रुपयांची रोकडदेखील जप्त केली.

उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली कांदिवली, वांद्रे, वरळी व आझाद मैदान युनिटने बोरिवली, वांद्रे, खार, धारावी, गोरेगाव आदी सहा ठिकाणी कारवाई करत एकूण दहा ड्रग्ज तस्करांना बेडय़ा ठोकल्या. त्या सर्वांकडून 739 ग्रॅम वजनाचे हेरॉईन, 452 ग्रॅम वजनाचे एमडी तसेच पाच लाख 80 हजार रुपयांची रोकड असा तब्बल चार कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. थर्टी फर्स्टच्या तोंडावर पोलिसांनी ड्रग्ज तस्करांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केल्याने तस्करांसह नशेबाजांची गोची झाली आहे.

कोकेनची तस्करी करणारा गजाआड

कोकेनची तस्करी करणाऱया मोनाची अगवू या परदेशी नागरिकाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 72 लाखांचे कोकेन जप्त केले. मालवणी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक डॉ. दीपक हिंडे, पाटील, शेख, देसाई, सोरटे, खड्डे यांचे पथक गुरुवारी रात्री गस्त करत होते. मालवणी परिसरात काही जण कोकेनची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे सापळा रचून त्याला गजाआड केले.

जोगेश्वरी येथे वृद्ध महिलेची हत्या

जोगेश्वरी पूर्व येथील झुला मैदान परिसरातील एका इमारतीमध्ये वृद्ध महिलेची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. हवाबी दलावी असे मृत महिलेचे नाव आहे. मृत महिलेची दोरीने गळा आवळून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी मेघवाडी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात हत्येचा गुन्हा नोंद केला आहे. याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे पथक करत आहे.

वृद्ध महिलेच्या घरी चोरी करणारा नोकर पोलिसांच्या ताब्यात

वृद्ध महिलेच्या घरी हातसफाई करून पळून गेलेल्या नोकराला कांदिवली पोलिसांनी अटक केली. राकेश महतो असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

कांदिवली येथे राहणाऱया तक्रारदार या ज्येष्ठ नागरिक आहेत. गेल्या सात महिन्यांपासून राकेश हा त्यांच्याकडे घरगडी म्हणून काम करत होता. बुधवारी राकेश हा घरकामासाठी आला. मात्र तो काम न करताच घरातून निघून गेला होता. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने दागिन्यांची तपासणी केली. तेव्हा ड्रॉवरमधील पाच लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर तक्रारदार महिलेने राकेशला कॉल केला. पण त्याने पह्न उचलला नाही. यामुळे महिलेने कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेत राकेशविरोधात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी राकेशविरोधात गुन्हा नोंद केला आणि शोधमोहीम हाती घेतली. पोलिसांनी तपास करून राकेशला ताब्यात घेतले.