आरबीआयकडून वर्षाचा शेवट गोड,व्याजदरात पाव टक्के कपात; ईएमआय घटणार, गृहकर्जापासून विविध कर्जे स्वस्त होणार

अमेरिकेने लादलेल्या टॅरिफमुळे अर्थव्यवस्थेवर पडलेला ताण कमी करण्याच्या दृष्टीने आरबीआयने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. आरबीआयने रेपो रेटमध्ये पाव टक्क्याची कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे गृहकर्जासह वाहन व इतर कर्जांवरील व्याजदर घटणार आहेत. याचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नव्या आणि जुने अशा दोन्ही ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. याशिवाय बँकांसाठी 1 लाख कोटी रुपयांचा बुस्टरदेखील आरबीआयने दिला आहे. त्यामुळे बँकांना रोखीची चणचण भासणार नाही.

आरबीआयच्या सहा सदस्यीय पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठक बुधवारपासून सुरू झाली. आज आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी तिमाही पतधोरण जाहीर केले. महागाईचा दर 2.2 टक्के असून जीडीपी वाढीचा दर 8 टक्के आहे. चालू आर्थिक वर्षात महागाईचा दर 2.6 टक्क्यांवरून 2 टक्क्यांपर्यंत घटविण्यात आला आहे. महागाई कमी असल्यामुळे व्याजदरात कपात करण्यासाठी वाव होता, असे मल्होत्रा यांनी सांगितले. काही नकारात्मक आणि आव्हानात्मक बाह्य घटक असूनही अर्थव्यवस्था भक्कम आहे. अर्थव्यवस्था आणखी वेगाने वाढेल, असे मल्होत्रा म्हणाले.

 1 लाख कोटी रुपयांचा बुस्टर

आरबीआयकडून डिसेंबर महिन्यात 1 लाख कोटी रुपयांची बाँड खरेदी केली जाणार आहे. याशिवाय 5 अब्ज डॉलर परकीय चलन खरेदीसाठी देणार आहे. त्यामुळे बँकांमध्ये रोखीची समस्या जाणवणार नाही.

 या वर्षी चार वेळा व्याजदर कपात

रेपो रेट म्हणजे आरबीआय बँकांना ज्या व्याजदराने कर्ज देते तो दर. त्यात आज 0.25 टक्क्याची कपात झाली आहे. त्यामुळे रेपो रेट आता 5.25 टक्के झाला आहे. या वर्षी फेब्रुवारीपासून आरबीआयने चौथ्यांदा व्याजदरात कपात केली आहे. या वर्षभरात 1.25 टक्का व्याजदर कपात करण्यात आली आहे.

ईएमआय किती कमी होणार?

व्याजदरात पाव टक्का कपात झाल्यानंतर 20 लाख रुपयांचे 20 वर्षांसाठी गृहकर्ज असल्यास साधारणतः 300 रुपयांनी ईएमआय कमी होईल. काही बँका ईएमआय कमी करतात, तर काही बँका हप्ते कमी करतात.