
सहा दशकांहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात अवीट ठसा उमटवणाऱया रविकिरण संस्थेची 39वी बालनाटय़ स्पर्धा यंदा अधिक दिमाखात साजरी होत आहे. 11 व 12 डिसेंबर रोजी यशवंत नाटय़मंदिर, माटुंगा येथे रंगणाऱया या स्पर्धेत 19 बालनाटय़ांची रंगतदार चुरस पाहायला मिळणार आहे. या वर्षीची ही स्पर्धा मंडळाचे ज्येष्ठ, निष्ठावान सभासद मनोहर नगरकर आणि कोकणच्या लाल मातीतील रंगकर्मी रघुनाथ कदम यांच्या स्मृतीस अर्पण करण्यात आली आहे. सुप्रसिद्ध लेखक अभिजित गुरू, लेखिका शर्वरी पाटणकर तसेच लेखक-दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी मुलं आणि शिक्षकांना लेखनकौशल्यातील बारकावे आत्मीयतेने शिकवले, ज्यामुळे यंदाच्या स्पर्धेत अधिक प्रभावी, अर्थपूर्ण आणि दर्जेदार बालनाटय़ांची निर्मिती घडून आली आहे.


























































