कोळगाव थडी घरफोडीप्रकरणी पाचजणांची टोळी गजाआड

कोळगाव थडी (ता. कोपरगाव) येथे घडलेल्या घरफोडी प्रकरणातील पाचजणांच्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तब्बल पाच लाख 20 हजार किमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला आहे.

मुख्य आरोपी कपिले राजू पिंपळे (वय 26) याच्यासह त्याचे साथीदार रोहित विशाल जगबंसी (ठाकुर), योगेश रवींद्र उदावंत, गडय़ा ऊर्फ सोनू दशरथ शिंदे, नंदू राजू पिंपळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रमोद एकनाथ धामणे (वय 53, रा. कोळगाव थडी) यांनी फिर्याद दिली होती.

प्रमोद धामणे हे 22 ते 24 नोव्हेंबरदरम्यान लग्नकार्याकरिता बाहेर गेले असता, चोरटय़ांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचे दागिने व रोकड असा मुद्देमाल पळवला होता. गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व स्थानिक माहितीच्या आधारे कोळपेवाडी परिसरातून संशयितांचा शोध घेतला. अटक केलेल्या आरोपींनी गुन्हा कबूल केला असून, त्यांच्याकडून पोलिसांनी 40.02 ग्रॅम सोन्याचे दागिने, दोन मोबाईल असा एकूण पाच लाख 20 हजार किमतीचा ऐवज जप्त केला. मुख्य आरोपी कपिले राजू पिंपळे याच्यावर अहिल्यानगर व जळगाव जिह्यात जबरी चोरी व घरफोडीचे तीन गुन्हे दाखल असल्याचेही पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ही कामगिरी केली.