
पुरंदर तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंगोरी येथील इला हॅबिटॅट सेंटरमध्ये तीन दिवस ‘उलूक’ उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक वनीकरण विभागाचे विवेक खांडेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन झाले. विविध कलाकृतींसह व्याख्यान, कीर्तन, प्रवचन, कविता, चित्रप्रदर्शन, रांगोळी अशा कार्यक्रमातून घुबडांबद्दलचे पैलू आणि इतिहास उलगडण्यात आला.या महोत्सवात अनेकांनी आपल्या चेहऱयावर तसेच हातावर चित्र काढून घुबड संवर्धनाचा संदेश दिला.
या महोत्सवात पिंगोरी गावचे सरपंच संदीप यादव, उपसरपंच प्रकाश शिंदे, इला फाउंडेशनचे डॉ. सतीश पांडे, डॉ. सुरुची पांडे, केंद्रप्रमुख राहुल लोणकर, पक्षी प्रेमी राजकुमार पवार, विजय हरिशश्चंद्रे, रियाज खान, डॉ. संजय रावळ, पोलीस पाटील राहुल शिंदे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, टाटा मोटर्सचे मुख्य व्यवस्थापक नवीन पांडे तसेच संजय खटावकर, स्वप्नील कुंभोजकर, राजू शर्मा यांच्यासह विद्यार्थी अभ्यासक सहभागी झाले होते.
घुबडांविषयीचे गैरसमज दूर व्हावेत…
n शेतकऱयांचा मित्र असलेल्या घुबडाच्या वाटय़ाला चित्रपट, मालिका आणि कथांमधून नेहमीच नकारात्मक भूमिका आली आहे. त्यातच लोकसहभागाशिवाय घुबड संवर्धन यशस्वी होऊ शकणार नाही. त्यामुळे या उत्सवातून शृंगी पिंगळा गव्हाणी शिंगळा मत्स, रक्तलोचन, तपकिरी-पिंगट, बहिरी आदी वन घुबडांविषयीचे गैरसमज दूर करण्याचा आम्ही गेल्या सहा वर्षांपासून प्रयत्न करत आहोत, असे इला फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश पांडे यांनी सांगितले.



























































