
छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू आणि लढवय्ये सरदार हंबीरराव मोहिते, ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकाळातही तितकीच दमदार कामगिरी केली. सोयराबाई या हंबीररावांच्या भगिनी होत्या आणि हंबीररावांची मुलगी राजाराम महाराज यांची पत्नी. त्यांचे छत्रपतींशी इतके घनिष्ठ नाते होते. संभाजी महाराजांच्या प्रत्येक प्रसंगात हंबीररावांनी मोलाची साथ दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्यात अनेक लढाया यशस्वीपणे लढल्या गेल्या. नेसरीच्या लढाईनंतर हंबीररावांनी आदिलशाही सेनेवर जबरदस्त उलटहल्ला केला आणि शत्रूला विजापूरपर्यंत पिटाळून लावले. 16 डिसेंबर 1687 साली मोगल सरदार सर्जाखान आणि हंबीरराव मोहिते यांच्यात वाडी येथे युद्ध झाले. या युद्धात तोफेचा गोळा हंबीररावांच्या शरीरावर आदळला आणि त्यांचे निधन झाले. या युद्धातील त्यांचे बलिदान आणि पराक्रम प्रेरणा देणारा आहे. त्यांचे समाधीस्थळ सातारा जिह्यातील तळबीड येथे आहे. वसंतगडाच्या पायथ्याशी असलेल्या तळबीड गावात भव्य षटकोनी घुमटाकृती वास्तुमध्ये चिरेंबी पाषाणात ही समाधी साकारलेली आहे. मराठा स्थापत्यशैलीचा अजोड नमुना असलेली ही समाधी एक महत्त्वाचे ऐतिहासिक व धार्मिक स्थळ आहे.


























































