माध्यमतंत्र – सोशल मीडिया आणि ट्रोलिंग

>> आशिष निनगुरकर

सोशल मीडिया चांगल्या व वाईट दोन्ही स्वभावाच्या माणसांनी मिळून बनला आहे. सोशल मीडियामुळे अनेक फायदे झाले असले, तरी सायबर गुह्यांमध्येही वाढ झाली आहे. या सायबर गुह्याचे थोडे सौम्य स्वरूप म्हणजे ट्रोलिंग! त्यावर टाकलेला दृष्टिक्षेप.

सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग आहे. दुनिया मेरी मुठ्ठी में याप्रमाणे, व्हाट्सअॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यासारखी समाजमाध्यमं जगातल्या सर्वांसाठी मुक्त आणि खुली आहेत. बरेचसे लोक याचा उपयोग व्यक्त होण्यासाठी करतात, तर काही आपल्या विचारांचा किंवा कामाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी याचा उपयोग करतात. असं जरी असलं तरी सकारात्मक गोष्टीसोबतच काही नकारात्मक गोष्टीसुद्धा त्याच्यासोबतच येतात. सध्याच्या काळात ट्रोलिंग करण्याचा प्रकार भरपूर प्रमाणात वाढत आहे. गंमत म्हणून सुरू झालेल्या ट्रोलिंगने आज भयानक रूप धारण केलेय. सोशल मीडियामुळे अनेक फायदे झाले असले, तरी सायबर गुह्यांमध्येही वाढ झाली आहे. या सायबर गुह्याचे थोडे सौम्य स्वरूप म्हणजे ट्रोलिंग!

ट्रोलिंगवर कायदा आणायला हवा. सोशल मीडिया सुरू झाल्यापासून ट्रोलर्स हा वेगळा कंपू तयार झाला आहे. सध्या भारतात प्रत्येक गोष्टीत धार्मिक विद्वेष शोधायचा प्रयत्न केला जातो. सध्या भारतात एक अशी झुंड तयार झालीय जी तुम्हाला तुमचा धर्म, तुमची जात सांगायला बाध्य करत आहे. हा शब्द कुठून आला, याचे मूळ शोधले असता युरोपात प्रचलित असणारी दंतकथा समजली. स्कँडिनेव्हिया देशात बेढब शरीर आणि भयानक चेहरा असणारा एक प्राणी राहायचा. हा लोकांना त्रास देत असे. या प्राण्यामुळे लोकांना दैनंदिन जीवन जगणे आणि प्रवास करणे कठीण झाले होते. या प्राण्याचे नाव होते ट्रोल. इंटरनेटवर होणाऱ्या त्रासाला ट्रोलिंग हे नाव याच्यामुळेच पडले. तसा ट्रोलिंगचा इंग्लिशमध्ये सरळ साधा अर्थ `मासेमारी’ असाही होतो.

ट्रोलिंगचे ढोबळमानाने तीन प्रकार पडतात. कॉर्पोरेट ट्रोलिंग – एखाद्या व्यावसायिक कंपनीला नफा मिळावा किंवा व्यवस्थित सुरू असणाऱया एखाद्या कंपनीचे दिवाळे निघावे हा यामागचा उद्देश असतो. हे काम पैसे देऊन केले जाते. सुमार कंपनीची उगाचच भलामण करणाऱया पोस्ट दिसू लागल्या किंवा कुण्या कंपनीला शिव्या देणाऱया पोस्टमध्ये अचानक वाढ दिसू लागली की समजून जावे – हे कॉर्पोरेट ट्रोलिंग सुरू आहे. पॉलिटिकल ट्रोलिंग – हा प्रकार आपल्या सर्वांच्या व्यवस्थित परिचयाचा आहे. राजकीय पक्ष जसे पूर्वी ग्राऊंड लेव्हलवर काम करणारे कार्यकर्ते बाळगून असत, त्याच प्रकारे आता ट्रोल करणारे आहेत. पर्सनल ट्रोलिंग – एखाद्या व्यक्तीवर टीकेची झोड उठवणे, शिवीगाळ करणे याला वैयक्तिक ट्रोलिंग म्हणतात. हे ट्रोलिंग राजकीयदृष्टय़ा प्रेरित असू शकते किंवा एखाद्या व्यक्तीच्या स्वभावामुळे, त्याच्या विचारसरणीमुळे, विसंगतीमुळे किंवा लिखाणात चुकल्यामुळे होऊ शकते. सचिन पिळगावकर हे वैयक्तिक ट्रोलिंगचे ठळक उदाहरण आहेत, असे म्हणायला हरकत नाही.

हे ट्रोलिंग टाळता येऊ शकते का? याचे उत्तर नाही असे आहे. सोशल मीडियावर आपले अकाऊंट असेल तर आपण केव्हाही ट्रोलिंगचे शिकार होऊ शकतो, हेच खरे. भारतात ट्रोलिंगविरोधी काही कायदा अस्तित्वात नाही. ट्रोलिंग मर्यादेच्या बाहेर जाऊन जर मारहाण करण्याच्या किंवा जीवे मारण्याच्या धमक्या येत असतील, तर मात्र पार दाखल करता येते आणि त्यावर बऱयाच वेळा पोलिसांतर्फे योग्य तपासाअंती कारवाईसुद्धा होते. पण तरीही, काही उपायांनी आपण याची तीव्रता नक्कीच कमी करू शकतो. ट्रोलिंगमध्ये स्त्राr-पुरुष असा भेदभाव नसला, तरी याचा जास्त त्रास स्त्रियांनाच होतो हे उघड सत्य आहे. पण कुणीही असो, अनोळखी माणसांना आपल्या मित्रयादीत प्रवेश देऊ नये. जर कुणाकडून त्रास होण्याची शक्यता वाटत असेल, तर त्या व्यक्तीला ताबडतोब अनफ्रेंड किंवा ब्लॉक करावे. तुम्हाला मानसिक त्रास व्हावा हाच ट्रोल करणाऱ्याचा मुख्य उद्देश असतो. त्याचा हा उद्देश सफल होऊ नये म्हणून त्याच्या कॉमेंट्सवर चिडून त्याच भाषेत प्रत्युत्तर देऊ नये. आपले फ्रेंड सर्कल मर्यादित ठेवल्यास बऱयाच समस्यांपासून सुटका होते. आपल्या आसपास समविचारी, अभ्यासू आणि सुसंस्कृत व्यक्ती जितक्या जास्त असतील, तितकाच ट्रोलिंगचा धोका कमी होतो.

असे ट्रोलिंग का केले जात असावे? यामागे काय मानसिक आणि सामाजिक कारणे असावी? यासंबंधी विचार करण्यासारखे आहे. यात एका क्षणासाठी सूड घेणारा आनंद मिळवणं यापलीकडे बरेचदा काही नसतं. याची दुसरीही बाजू अशी आहे की, बरेच लोक `अटेंशन सिकिंग बिहेविअर’ असणारे असतात. त्यामुळे सगळ्याच वेळी ट्रोलिंग करणारेच दोषी नसतात. या ट्रोलयुगात थोडे जबाबदारीने वागून, यापासून थोडाफार बचाव करता येतो. शेवटी समाजमाध्यम हा सामाजिक संवादाचा एक मार्ग आहे. जिथे कुठे सकारात्मकता आहे तिथे नकारात्मकताही कुठे तरी येणारच आहे, म्हणूनच योग्य ती सावधगिरी बाळगणे आणि सक्षमपणे वापर करणे हीच गरज आहे.
[email protected]