प्रेरणा – आजीबाईंचा शिक्षणाचा ध्यास

>> प्रिया कांबळे

वय वर्ष 60 ते 97 वयोगटातील आज्या साक्षरतेचे धडे गिरवत आहेत. मुरबाडमधील शेलारी आणि म्हाडस पाडा या गावांमध्ये `आजीबाईंची शाळा’ या उपक्रमाद्वारे अशिक्षित आजीबाई आता साक्षरतेच्या प्रवाहात येत आहेत.

मुरबाडमधील शेलारी आणि म्हाडस पाडा या गावांमध्ये `आजीबाईंच्या शाळे’तून अशिक्षित आजींचा सुशिक्षित प्रवास सुरू झाला आहे. शिक्षिका शीतल मोरे आणि योगेंद्र बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील आजीबाई साक्षरतेचे धडे गिरवीत आहेत. येथे वय वर्ष 60 ते 97 वयोगटातील आज्या शिक्षणाचे ध्येय पूर्ण करण्यासाठी एकत्र येत आहेत. या उपामांमुळे अशिक्षित आजीबाईं साक्षरतेच्या प्रवाहात येत आहेत.

सुप्रसिद्ध लेखक, साहित्यिक योगेंद्र बांगर यांच्या संकल्पना व प्रयत्नांतून कै. मोतीराम गणपत दलाल ट्रस्ट संचलित जगातील पहिल्या आजीबाई शाळेतील शिक्षक शीतल मोरे या दहावीपर्यंत शिकलेल्या आहेत. गावात त्या सर्वात सुशिक्षित होत्या, त्यामुळे त्यांची शिक्षिका म्हणून निवड करण्यात आली. गावातील प्रकाश मोरे यांच्या जागेत पर्यावरणस्नेही झोपडी उभारून त्यात आजीबाईंची शाळा भरू लागली. तेथे आजींबाई मागील 9 वर्षांपासून शिक्षण घेत आहेत.

आम्हाला लिहता वाचता येत असते तर, शिवजयंतीच्या आनंदोत्सवात आम्हीही सहभागी झालो असतो’ अशी खंत काही वर्षांपुर्वी या आजींनी व्यक्त केली होती. यातूनच `आजीबाईंची शाळा’ या अनोख्या उपामास सुरूवात होऊन आजपर्यंत हा उपाम राबविला जात आहे. त्यामुळे मंदिरातील अध्यात्मात न रमता शाळेत रमण्याचा ट्रेंड या आजीबाईंनी सुरू केला आहे. येथील आजीबाईंच्या शाळेला सुरुवात झाली असून येथे त्यांना बाराखडी आणि शिक्षणाचे महत्त्व शिकवले जाते आहे. सुरुवातीला दोन तास आणि नंतर कामाच्या सोयीनुसार शनिवार-रविवार असे दोन दिवस शाळेची हजेरी लावली जात आहे.
निरक्षर महिलांना शिक्षण देण्यासाठीही विविध उपाम राबवले जात आहेत. यामध्ये मध्यंतरी एक हजार महिलांसोबत स्वाक्षरी शिकवण्याचे कार्य पार पडले. आता, यामध्ये कातकरी महिलांसाठी `आईची शाळा’ हा उपाम राबविला जात आहे.

जपाननेही घेतली दखल
या शाळेची जपाननेही दखल घेतली असून जपानमधील अभ्यासकांनीही या शाळांना भेट दिली आहे. ज्यामुळे मुरबाडच्या आजीबाईंचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक मजबूत झाला आहे. मुरबाडच्या आजीबाईची शाळा आता लवकरच जपानी भाषेतून देखील जगभर गौरविली जाणार असल्याने मुरबाड तालुक्याच्या शिरपेचात आणखीन एक मनाचा तुरा रोवला जाणार आहे. या गौरवासाठी शाळेच्या शिक्षिका शितल मोरे, ट्रस्टचे अध्यक्ष दिलीपभाई दलाल यांनी त्यांचे आभार मानले.

97 वर्षाच्या आजीचा सहभाग
या गावातील आजीबाईंच्या शाळेत 30 आजी शिक्षण घेत आहे. काही आजी कालवश झाल्यास त्यांच्या जागी इतर आजी सहभागी होतात. शाळेत सध्या 97 वर्षांची हौसा केदार आजी शिक्षण घेत आहे. आजीबाईंच्या शाळेत शिक्षणासोबतच ाढाrडा महोत्सव घेतला जातो. त्यात आजी कबड्डी, खो-खो सारखे खेळ खेळतात. हस्तकला, चित्रकला,रांगोळी यांसारख्या स्पर्धा घेतल्या जातात.