
इंडिगो एअरलाइन्सची 500 पेक्षा जास्त विमाने सलग पाचव्या दिवशी रद्द झाल्याने प्रवाशांचा संयमही सुटला. अनेक विमानतळांवर इंडिगोचे कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये भांडणे झाली. संताप अनावर झाल्यामुळे प्रवाशांनी कंपनीच्या काउंटरवर चढून थयथयाट केला. पाच दिवसांच्या नाटय़ानंतर मोदी सरकारला जाग आली. इतर कंपन्यांनी तब्बल 10 पट प्रवासभाडे आकारल्यानंतर मोदी सरकारला तिकीट दरांवर मर्यादा टाकण्याची आठवण आली. सरकारने अंतरानुसार 7500 ते 18 हजार रुपयांपर्यंत प्रवासभाडे निश्चित करण्यात आले.
गेल्या सहा दिवसांपासून इंडिगोची तब्बल 2,500 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द करण्यात आली. त्याशिवाय हजारो उड्डाणांना विलंब झाला. त्यामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अनेक प्रवाशांवर तब्बल तीन दिवस विमानतळावर मुक्काम करण्याची वेळ आली. काही प्रवाशांनी तर उभ्या असलेल्या विमानाच्या खालीच झोपा काढल्या. या सर्व नाटय़ानंतर प्रवाशांचा संयम सुटायला लागला. ठिकठिकाणी इंडिगोचे कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये भांडणे होताना दिसत आहे. या सर्व गोंधळामुळे प्रवासी अक्षरशः वेठीस धरले गेले आहेत. हजारो प्रवाशांचा प्रचंड मनस्ताप झाल्यानंतर झोपेचे सोंग घेतलेले मोदी सरकार खडबडून जागे झाले. रद्द झालेल्या तिकिटांचे पूर्ण पैसे रविवारी सायंकाळी 8 वाजेपर्यंत परत करण्याचे तसेच सामान 48 तासांमध्ये परत करण्याचे आदेश इंडिगोला देण्यात आले आहेत.
लाखो रुपये लुटल्यानंतर प्रवासभाडय़ावर लावले निर्बंध
इंडिगोच्या नाटय़ामुळे इतर विमान कंपन्यांनी अवाचेसवा प्रवासभाडे आकारल्यानंतर मोदी सरकारचे डोळे उघडले. सरकारने प्रवासभाडय़ावर प्रवासाच्या अंतरानुसार निर्बंध लावले आहेत. तसा आदेश जारी केला. तोपर्यंत इतर कंपन्यांनी हात धुऊन घेतले. अनेक ठिकाणी तब्बल जिथे 6 हजार रुपये भाडे आहे, तिथे 70 ते80 हजार रुपयांपर्यंत प्रवासभाडे आकारण्यात आले. या मनमानी आकारणीमुळे प्रवासी हवालदिल झाले. प्रवासभाडय़ाचे रिअलटाइम ट्रॅकिंग करण्यात येणार असून उल्लंघन करणाऱया कंपन्यांवर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे.
अडचणीत रेल्वे आली धावून
देशभरातील विमान सेवेवर परिणाम झाल्यानंतर अखेर रेल्वे मदतीला धावून आली आहे. मध्य, पश्चिम, उत्तर, उत्तर पश्चिम, दक्षिण तसेच पूर्व विभागांनी विशेष गाडय़ांचे नियोजन केले आहे. रेल्वेने शुक्रवारी 37 प्रिमियम गाडय़ा सोडल्या, तर 117 अतिरिक्त डबे जोडले. त्यानंतर पुढील तीन दिवसांत 89 विशेष गाडय़ा सोडण्याची घोषणा केली. मध्य रेल्वेने मडगाव, नागपूर, चेन्नई या दिशेने जाणाऱया प्रवाशांसाठी अतिरिक्त डबे आणि गाडय़ा सोडल्या आहेत.
तुम्ही अपयशी ठरले आहात, डीजीसीएची इंडिगोच्या सीईओंना नोटीस
हजारो प्रवाशांना मनस्ताप झाल्यानंतर इंडिगोची ‘डीजीसीए’ने चांगलीच कानउघाडणी केली असून कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नव्या नियमांना अनुसरुन योग्य नियोजन करण्यात आले नाही आणि सीईओ म्हणून तुमची विमान कंपनीच्या व्यवस्थापनात प्रमुख जबाबदारी असते. तुम्ही तुमच्या कर्तव्याचे पालन करण्यात अपयशी ठरले आहात, असे खडे बोल डीजीसीएने कंपनीचे सीईओ पीटर अल्बर्स यांना सुनावले आहेत. पंपनीला नोटीशीला उत्तर देण्यासाठी 24 तासांची मुदत दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
इंडिगोच्या भोंगळ कारभारानंतर सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. मोठय़ा प्रमाणावर रद्द झालेली उड्डाणे आणि विलंब हे मानवी चुकांमुळे झाले असून प्रवाशांच्या हक्कांचे हनन झाले आहे. याप्रकरणी न्यायालयाने दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. ‘इंडिगो ऑल पॅसेंजर अँड अनादर’ या समूहाने ही याचिका दाखल केली असून सरन्यायाधीशांनी स्वतःहून दखल घेऊन चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी आणखी एका याचिकेतून करण्यात आली आहे.
यापेक्षा जास्त भाडे घेवू नका
500 किमीपर्यंत 7,500 रुपये
500 ते 1000 किमी 12,000 रुपये
1000 ते 1500 किमी 15,000 रुपये
1500 किमीपेक्षा जास्त 18,000 रुपये





























































