यंदा हिवाळ्यात गरमागरम पाया सूपचा आस्वाद घ्या

हिवाळ्यात गरम पाया सूप आहारात समाविष्ट करणे खूप गरजेचे असते. मटन पाया सूप, ज्याला बोन ब्रॉथ सूप असेही म्हणतात. पाया सूप पिल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, हाडे आणि सांधे मजबूत करते तसेच स्नायूंची ताकद वाढवते.  हिवाळ्यात पाया सूप शरीराला उब आणि ऊर्जा प्रदान करते. त्यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर असल्याने अशक्तपणा दूर करून शरीराला पोषण मिळते आणि केस गळतीसारख्या समस्यांवरही ते फायदेशीर ठरते.

मटण पाया सूप पिणे तुमच्यासाठी कसे फायदेशीर ठरू शकते

  • हाडे आणि सांधे मजबूत करते. मटण पायामध्ये कोलेजन, जिलेटिन, ग्लुकोसामाइन आणि कॉन्ड्रोइटिनचा एक उत्कृष्ट स्रोत आहे. ज्यामुळे सांधेदुखी कमी करण्यासाठी आणि हाडांच्या कमकुवतपणा कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.
  • मटण पाया सूपमध्ये असलेले खनिजे आणि पोषक तत्व तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, ज्यामुळे तुम्हाला सर्दी आणि संसर्गापासून संरक्षण मिळते.
  • मटण पाया सूप एक नैसर्गिक प्रथिनांचे पॉवरहाऊस आहे, जे शारीरिक थकवा आणि अशक्तपणा दूर करून शरीरात  ऊर्जा प्रदान करते.
  • हे सूप हलके आणि सहज पचण्यासारखे असते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.
  • मटण पाया सूपमध्ये असलेले कोलेजनचे प्रमाण जास्त असल्याने, ते तुमच्या त्वचेची लवचिकता आणि केसांचे आरोग्य राखण्यास देखील मदत होते.

मटण पाया सूप रेसिपी
साहित्य-

मटण पाया – ४ ते ६, पूर्णपणे स्वच्छ केलेले.
पाणी – ६ ते ८ कप.
कांदा – १ मध्यम आकाराचा, बारीक चिरलेला.
आले-लसूण पेस्ट – २ चमचे.
संपूर्ण मसाले – तमालपत्र , काळी वेलची, दालचिनी (१ इंच), लवंगा (४-५), काळी मिरी (८-१०)
हळद पावडर (१/२ टीस्पून),
धणे पावडर (१ टीस्पून),
मीठ (चवीनुसार),
काळी मिरी पावडर (१/२ टीस्पून).
तेल किंवा तूप – २ ते ३ चमचे.
ताजी कोथिंबीर आणि लिंबाचा रस

सर्वप्रथम मटण पाया नीट धुवून घ्या. प्रेशर कुकरमध्ये तेल किंवा तूप गरम करा, त्यात चिरलेला कांदा घाला आणि सोनेरी तपकिरी होईपर्यंत परतून घ्या.

कांदे सोनेरी झाले की, त्यामध्ये आले-लसूण पेस्ट घाला आणि कच्चा वास जाईपर्यंत एक मिनिट परतून घ्या.नंतर हळद , खडे मसाले आणि धणे पावडर घाला आणि चांगले मिसळा. यानंतर, स्वच्छ केलेले पाय आणि सर्व मसाले घाला आणि २ मिनिटे परतून घ्या, जेणेकरून पाय मसाले शोषून घेतील. चवीनुसार मीठ आणि पाय पूर्णपणे बुडेल इतके ६ ते ८ कप पाणी घाला. पाणी घातल्यानंतर, कुकरचे झाकण बंद करा.

मोठ्या आचेवर एका शिट्टीनंतर, आच कमी करा आणि सूप सुमारे ३५ ते ४० मिनिटे उकळू द्या. पाया सूप कमी आचेवर शिजवणे महत्वाचे आहे जेणेकरून हाडांमधील सर्व पोषक घटक पाण्यात सोडले जातील. त्यानंतर कुकर थंड झाल्यावर सूप बाऊलमध्ये काढून घ्या . त्यावर काळी मिरी पावडर, ताजी कोथिंबीर आणि लिंबाचा रस घाला आणि गरमागरम सर्व्ह करा.