
वाढदिवसाच्या डेकोरशनसाठी फुगा फुगवत असताना फुटला आणि श्वसननलिकेत अडकल्याने 13 वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भावाच्या वाढदिवशीच बहिणीचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुलांना फुगे फुगवायला देताना काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील दिघी गावात ही घटना घडली. अशोक कुमार यांच्या तीन वर्षाच्या मुलाचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या डेकोरेशनसाठी अशोक कुमार यांची 13 वर्षीय मुलगी कुमकुम फुगे फुगवत होती. फुगा फुगवताना फुटला. त्याचे काही तुकडे कुमकुमच्या घशात गेले आणि श्वसननलिकेत अडकले.
कुमकुमला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. श्वसननलिकेत फुग्याचे तुकडे अडकल्याने श्वास गुदमरून कुमकुमचा मृत्यू झाला. कुमकुमच्या मृत्यूमुळे कुटुंबियांना मानसिक धक्का बसला आहे.


























































