
देशभरात इंडिगोची विमान सेवा कोलमडल्यामुळे हजारो प्रवाशांची अतोनात हाल झाले. त्याचवेळी गोव्यात आग लागून 25 जणांचे बळी घेणाऱ्या नाईट क्लबचे दोन्ही मालक चक्क एकाच दिवसात इंडिगोच्या विमानाने परदेशात पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारानंतर खडबडून जागे झालेल्या गोवा पोलिसांनी सौरभ आणि गौरव लुथरा या दोघांविरोधात इंटरपोलची मदत घेतली असून दोघांविरोधात ब्ल्यू नोटीस जारी केली आहे, तर नाईट क्लबच्या चेनमधील दुसऱ्या क्लबवर प्रशासनाने बुलडोजर कारवाई केली.
‘बिर्च बाय रोमियो लेन’ या नाईट क्लबला 6 डिसेंबरला रात्री उशिरा भीषण आग लागली होती. त्यात नाईट क्लबच्या 20 कर्मचाऱ्यांसह 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेच्या अवघ्या 6 तासांमध्येच सौरभ आणि गौरव लुथरा थायलँडला पळून गेले. पोलिसांनी घटनेनंतर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. 7 डिसेंबरला दोघांच्या विरोधात लुकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आले, मात्र तोपर्यंत दोघे परदेशात पळून गेले. इमिग्रेशनच्या रेकॉर्डनुसार, 7 डिसेंबरला दोघे सकाळी 5.30 वाजता इंडिगोच्या विमानाने फुकेट येथे रवाना झाले. 6 डिसेंबरला इंडिगोची 800 तर 7 डिसेंबरला 650 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली होती. हजारो प्रवासी विविध विमानतळांवर अडकून पडले होते, मात्र अवघ्या 6 तासांमध्येच दोघांना इंडिगोचे तिकीट मिळाले आणि ते पळून गेले, यावरून गोवा सरकारची मोठी नाचक्की झाली आहे.
मिठागरांवर बनवला होता अवैध क्लब
क्लबच्या जमिनीचे मूळ मालक प्रदीप घाडी अमोणकर यांनी सांगितले की, मिठागरांवर अवैध पद्धतीने क्लब उभारण्यात आला होता. हे प्रकरण 20 वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित आहे. गोवा सरकारने क्लब चेनच्या आणखी दोन मालमत्ता सील केल्या आहेत. तसेच चौकशीसाठी चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे.




























































