
वर्षअखेर आणि नववर्ष स्वागताच्या पाटर्य़ांमध्ये कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी पालिका मुंबईतील रेस्टॉरंट, हॉटेल्स, बार, पब, लॉजिंग-बोर्डिंग, पार्टी हॉल्स, तारांकित हॉटेल्स यांची झाडाझडती घेणार असून अग्निशमन यंत्रणा सक्षमरीत्या कार्यान्वित आहे की नाही, याची तपासणी करणार आहे. या तपासणीत अग्निशमन यंत्रणा बंद असल्याचे आढळल्यास कायद्यानुसार नोटीस बजावल्यानंतर कारवाई करण्यात येणार असून वीज, पाणी कापणे, सील करणे अशी कारवाई होऊ शकते.
गोव्यातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पालिका 22 ते 28 डिसेंबरदरम्यान विशेष तपासणी मोहीम राबवणार आहे. शिवाय आगीच्या घटनेप्रसंगी बचावकार्य सामग्री, अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सज्ज असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. अग्निसुरक्षेच्या दृष्टीने अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी आज पालिका आणि अग्निशमन अधिकाऱयांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेऊन अग्निसुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सूचना दिल्या. अशा दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशमन दलाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येणार असल्याचे प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर यांनी सांगितले. आतापर्यंत 12 आस्थापनांवर कारवाई केली आहे.


























































