
महायुती सरकारने शीव येथील चार एकरचा भूखंड विश्व हिंदू परिषदेला देण्यास नुकतीच मंजुरी दिली आहे. मुंबई महानगरपालिकच्या ताब्यात असलेली ही जागा भाडेतत्त्वावर न देता ‘व्यापारी तत्त्वावर’ दिला आहे. त्यामुळे ‘विहिंप’ला जमिनीच्या वापराचे पूर्णाधिकार मिळणार आहेत.
महापालिकेच्या एफ/उत्तर विभागातील सर्वेक्षण क्र. 12 येथे असलेला हा भूखंड वाटप करण्याचा प्रस्ताव पालिका अधिनियम, 1888 च्या कलम 92 (डीडी) अंतर्गत मांडण्यात आला होता. या भूखंडाच्या वाटपाची मंजुरी मिळण्यासाठी नगरविकास खात्याकडे ऑक्टोबरमध्ये सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला 4 डिसेंबर रोजी मंजुरी दिली. यानुसार 7558.33 चौ. मीटर म्हणजेच सुमारे 4 एकरचा हा भूखंड व्यापारी तत्त्वावर देण्यात आला आहे. दरम्यान, ही जमीन मूळतः राज्य सरकारची होती आणि ती विशिष्ट उद्देशांसाठी बीएमसीकडे हस्तांतरित करण्यात आली होती.
नगरविकास विभागाने 4 डिसेंबर रोजी मंजुरी देताना स्पष्ट केले की, हे व्यापारी हक्क औपचारिकपणे 25 जून 2025 पासून म्हणजे ज्या तारखेला पालिकेने मंजुरी दिली त्या दिवसापासून 30 वर्षांसाठी राहतील.


























































