शिवडीचे पोस्ट ऑफिस दादरला स्थलांतरित करू नका! शिवसेनेची आग्रही मागणी 

केंद्रीय पोस्टल खात्याच्या आदेशाने शिवडी पोस्ट ऑफिसचे दादर पोस्ट कार्यालयात विलीनीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे शिवडी परिसरातील नागरिकांना पोस्ट ऑफिस संबंधित कामासाठी आता दादर टी.टी. येथे हेलपाटे घालावे लागणार आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा शिवसेनेतर्फे  निषेध करण्यात आला. तसेच हे विलीनीकरण रद्द करावे, अशी मागणी शिवसेनेने मुख्य पोस्ट मास्तर यांच्याकडे केली.

शिवडी पोस्ट ऑफिस हे शिवडी परिसरातील हजारो नागरिकांसाठी आणि आजूबाजूच्या परिसरातील औद्योगिक संस्थासाठी अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला आणि सामान्य लोकांना विविध पोस्टल सेवांसाठी या पोस्ट ऑफिसला भेट देतात. हे पोस्ट ऑफिस दादर एच. ओ. मध्ये स्थलांतरित झाले तर त्यांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाया जाईल.

शिवडीतील नागरिकांच्या सोयीसाठी हे पोस्ट ऑफिस सध्याच्या ठिकाणीच असणे आवश्यक आहे. त्यामुळे ते स्थलांतरित करू नये, अशी मागणी माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी पोस्ट मास्टर बोरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अन्यथा आंदोलन करू

शिवडी पोस्ट ऑफिसच्या स्थलांतराविरोधात शिवसेना शाखा क्र. 206च्या वतीने विभागात सह्यांची मोहीम राबविण्यात आली. पोस्ट विभागाने आपला निर्णय बदलला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सचिन पडवळ यांनी दिला.