
IPL 2026 ची लिलाव प्रक्रिया जसजशी जवळ येत आहे तसतसं खेळाडूंची धाकधूक वाढू लागली आहे. 350 खेळाडूंचा यापूर्वीच लिलाव प्रक्रियेमध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र आता BCCI ने या खेळाडूंच्या यादीमध्ये आणखी 9 खेळाडूंचा समावेश केला आहे. त्यामुळे 16 डिसेंबर रोजी अबुधाबीमध्ये होणाऱ्या लिलाव प्रक्रियेमध्ये देश-विदेशातील 359 खेळाडू आपलं नशीब आजमावणार आहेत.
IPL मध्ये खेळण्यासाठी देश-विदेशातले खेळाडू उत्सुक असतात. परंतू सर्वांनाच लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याची आणि खेळण्याची संधी मिळत नाही. यंदाही जवळपास 1390 खेळाडूंनी आपल्या नावाची नोंद लिलाव प्रक्रियेसाठी केली होती. मात्र, BCCI ने खेळाडूंची अंतिम यादी घोषित करत 359 खेळाडूंना लिलाव प्रक्रियेसाठी संधी दिली आहे. नव्याने 9 खेळाडूंची या लिलाव प्रक्रियेमध्ये निवड करण्यात आली आहे. या खेळाडूंमध्ये तीन खेळाडू विदेश आणि सहा खेळाडू हिंदुस्थानातील आहेत. विशेष म्हणजे मलेशियाच्या खेळाडूची पहिल्यांदाच लिलाव प्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे.
नव्याने लिलाव प्रक्रियेमध्ये समावेश करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी खेळाडू स्वस्तिक चिकारा, त्रिपुराचा अष्टपैलू खेळाडू मणिशंकर मुरासिंह, हैदराबादचा चामा मिलिंद, कर्नाटकचा के के.एल श्रीजित, उत्तराखंडचा राहुल राज नमाला आणि झारखंडच्या विराट सिंह या हिंदुस्थानी खेळाडूंचा समावेश आहे. तर विदेशी खेळाडूंमध्ये मलेशियाच्या विराटदीप सिंह, दक्षिण आफ्रिकेचा इथन बॉश, ऑस्ट्रेलियाचा क्रिस ग्रीन या खेळाडूंचा समावेस आहे. या सर्व खेळाडूंची मुळ किंमत प्रत्येकी 30 लाख रुपये इतकी आहे.
























































