
मिनी महाबळेश्वर दापोलीत चालू वर्षीच्या हिवाळी हंगामात मंगळवारी 8.7 अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली होती ते तपमान बुधवारी खाली उतरून 7.2 अंश सेल्सिअस ईतक्या सर्वात निचांकी तपमानाची नोंद झाली . खाली घसरलेल्या थंडीच्या पाऱ्याने संपूर्ण तालुक्यालाच थंडीने पुरते गारठवले. त्यामुळे थंडीने गारठलेले दापोलीकर मंगळवारी सायंकाळपासुनच बुधवारी अगदी सकाळी उशीरापर्यंत शेकोटया पेटवून शेक घेत होते. तर थंड हवेचे ठिकाण समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये काल चे तपमान 10 अंश सेल्सिअस होते.
दापोली तालुक्यात यावर्षीच्या हिवाळी हंगामात रविवारी 7 डिसेंबर रोजी 12.0 अंश सेल्सिअस , सोमवारी 8 डिसेंबर रोजी 11.4 , मंगळवारी 9 डिसेंबर रोजी 8.7 अंश सेल्सिअस तर बुधवारी 10 डिसेंबर रोजी हेच तपमान 7.2 ईतक्या खाली उतरून निचांकी तापमानाची डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामान केंद्रात नोंद झाली आहे . दापोलीत खाली उतरत चाललेल्या थंडीच्या पा-यामुळे बोच-या थंडीने दापोलीकर चांगलेच गारठले. तर पर्यटनासाठी दापोलीत आलेल्या पर्यटकांना मात्र हुडहुडी भरणाऱ्या गुलाबी थंडीने एका वेगळ्याच अनुभूतीच्या आल्हाददायक वातावरणाची चांगलीच जाणीव करून दिली. येथे आलेल्या पर्यटकांना ते उतरलेल्या निवासी कॅम्पस मध्ये पर्यटक व्यावसायिकांनी शेकोटया पेटवून देत त्यांना कोकणातील आदरातिथ्य काय असते हे दाखवून दिले.

























































