
मुंबईत बेस्टमध्ये शालेय विद्यार्थ्यांना मोफत प्रवास करण्याची सुविधा देण्यात आली आहे, त्याच धर्तीवर मेट्रो रेल्वेमध्येही विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवासाची सुविधा द्यावी, अशी मागणी शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी आज विधान परिषदेत केली.
सुनील शिंदे यांनी औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे हा विषय सभागृहात मांडला. मुंबई महानगर आणि आसपासच्या परिसरात मेट्रोचे जाळे विस्तारले आहे. मुंबईतील वाहतूककोंडीने त्रस्त झालेल्या प्रवाशांना आणि विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना या मेट्रो मार्गामुळे प्रवासाचे नवीन साधन उपलब्ध झाले आहे. वेळेची बचत होत आल्याने विद्यार्थ्यांचा मेट्रोला मोठा प्रतिसाद लाभत आहे. परंतु मेट्रोचे रोजचे भाडे शालेय विद्यार्थ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे, याकडे आमदार शिंदे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
दरम्यान, माहीम येथे न्यू माहीम स्कूलची इमारत धोकादायक ठरवून पाडण्याच्या हालचाली मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱयांकडून सुरू आहे. ही इमारत पाडल्यानंतर पुन्हा बांधणार कधी याची माहिती नागरिक आणि पालकांना द्या, असे शिंदे म्हणाले. त्यावर याप्रश्नी तातडीने महानगरपालिका आयुक्तांना आदेश दिले जातील, असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.






























































