गोवा अग्निकांड प्रकरण, क्लब मालक लुथरा बंधूंना ताब्यात घेण्यात यंत्रणांना यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोवा नाईटक्लब अग्निकांडातील प्रमुख आरोपी लुथरा बंधूंभोवती आता फास आवळला गेला आहे. गोवा नाईटक्लब आगीनंतर थायलंडला पळून गेलेल्या फरार लुथरा बंधूंना अखेर ताब्यात घेण्यात यंत्रणांना यश आले आहे. गोवा सरकारने त्यांचे पासपोर्ट रद्द करण्याची मागणी केली होती. दोन्ही भाऊ कायद्याच्या कचाटातून वाचण्यासाठी देश सोडून पळून गेले होते. त्यांना थायलंडध्ये फुकेट येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

“बर्च बाय रोमियो लेन” नाईटक्लबचे मालक सौरभ आणि गौरव लुथरा यांना ताब्यात घेण्यात आल्याचे, अधिकृत वृत्त आले नाही. पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, इंटरपोलने लुथरा बंधूंविरुद्ध ब्लू कॉर्नर नोटीस जारी केल्यानंतर त्यांच्या ताब्यात घेतल्याची बातमी आली आहे.

पोलिसांनी कारवाई करत नाईट क्लब आगीतील मुख्य आरोपी गौरव आणि सौरभ लुथरा यांचे पासपोर्ट निलंबित केले आहेत. त्यांची अटक आता एक महत्त्वाचे पाऊल असून, परराष्ट्र मंत्रालयाला गोवा सरकारकडून लुथरा बंधूंचे पासपोर्ट रद्द करण्याची औपचारिक विनंती मिळाली. इंटरपोलने मंगळवारी दोन्ही भावांविरुद्ध ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली होती.

गोवा पोलिसांकडून लुथरा बंधूंविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते आणि घटनेनंतर ते फरार झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ डिसेंबर रोजी लुथरा बंधूंच्या घरी गेले तेव्हा त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या ठावठिकाण्याबद्दल माहिती देण्यास नकार दिला. त्यानंतर, न्यायालयाने राज्याला जामीन अर्जांवर उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले.