रणबीर कपूरचा ‘रामायण’ मराठी, तेलगू, तमिळ, अरबीसह 50 भाषांमध्ये होणार प्रदर्शित

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ हा हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या बजेटचा चित्रपट आहे. निर्माते नमित मल्होत्रा ​​यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचे दोन्ही भाग पूर्ण होईपर्यंत अंदाजे 4 हजार कोटींचा खर्च होणार आहे. मोठे बजेट असल्याने, महसूल मिळवण्यासाठी हा चित्रपट जागतिक स्तरावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. याकरता निर्मात्यांनी हा चित्रपट जगभरातील 50 भाषांमध्ये प्रदर्शित करण्याचे योजिले आहे.

इतक्या भाषांमध्ये पहिल्यांदाच हिंदुस्थानी चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने, हा विक्रम असणार आहे. मुख्यत्वे बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित होतात. काही चित्रपट बंगाली आणि मराठीमध्ये देखील प्रदर्शित झाले आहेत. शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात, इंग्रजी, मंदारिन (चीन) आणि निहोंगो (जपान) या भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित करणे सामान्य आहे. आमिर खानच्या दंगल आणि सीक्रेट सुपरस्टार या चित्रपटांनी चीनमध्ये लक्षणीय कमाई केली होती. या व्यतिरिक्त जपानमध्येही अनेक चित्रपटांनी चांगली कमाई केली आहे.

नुकताच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी अरबी भाषेतील एक व्हिडीओ शेअर केला आहे. वर्ल्ड ऑफ रामायण यूट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आलेला हा व्हिडीओ सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. मुख्य म्हणजे या व्हिडीओमध्ये फक्त मजकूर असून, हा मजकूर अरबीमध्ये लिहिण्यात आलेला आहे. 50 भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी निर्मात्यांनी आता कंबर कसली असून, या भाषांसाठी एआयची मदत घेण्यात येणार आहे.