शहा घाबरले! त्यांचे हात थरथरत होते!! राहुल गांधी यांनी डिवचले

मतचोरीच्या मुद्दय़ावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना जाहीर चर्चेचे आव्हान देणाऱ्या राहुल गांधी यांनी शहांवर आज पुन्हा हल्ला चढवला. ‘अमित शहा यांनी बुधवारी सभागृहात चुकीची भाषा वापरली. ते घाबरले होते. त्यांचे हात थरथरत होते,’ अशा शब्दांत राहुल यांनी शहा व भाजपला डिवचले.

निवडणूक सुधारणांवरील चर्चेच्या वेळी बुधवारी लोकसभेत राहुल गांधी व अमित शहा यांच्यात खडाजंगी झाली. त्यावेळी राहुल यांनी शहांना जाहीर वादविवादाचे आव्हान दिले होते. आधी मतचोरीवर बोला, असे सुनावले होते. त्यामुळे अमित शहा भडकले व त्यांनी उत्तरे देण्याऐवजी काँग्रेसवर आरोप केले.

राहुल यांनी आज पत्रकारांशी बोलताना पुन्हा त्यावर भाष्य केले. ‘अमित शहा हे मानसिकदृष्टय़ा दबावात होते. बुधवारी संसदेत आम्ही पाहिले. संपूर्ण देशाने पाहिले. मी जे प्रश्न विचारले त्यावर ते काहीच बोलले नाहीत. आमचे आरोप त्यांनी खोडून काढले नाहीत. मी जाहीर पत्रकार परिषदेत मतचोरीचे आरोप केले होते. मी बुधवारीही त्यांना आव्हान दिले की, मैदानात या. आपण सर्वांसमोर चर्चा करू. पण त्यांनी काहीच उत्तर दिले नाही,’ याकडे राहुल यांनी लक्ष वेधले.

‘साला’ बोलून फसले!

विरोधकांचे मतचोरीचे आरोप निवडणूक आयोगाने फेटाळल्याचा संदर्भ देताना अमित शहा यांनी लोकसभेत ‘साला’ शब्द वापरला. ’साला निवडणूक आयोग म्हणतो काहीच गडबड झालेली नाही, मग हे आरोप कसे करतात?,’ असे ते म्हणाले. त्यावरून प्रचंड गदारोळ झाला. चूक लक्षात आल्यावर हा शब्द कामकाजातून काढून टाकला, असे त्यांनी स्वतःच जाहीर केले.