
>> अशोक बेंडखळे
भगिनी निवेदिता या स्वामी विवेकानंदांच्या शिष्या. त्यांचे मूळचे नाव मार्गरेट ई. नोबल. त्यांनी सर्व जीवन भारताच्या सेवेस दिले. 1910 च्या सुमारास त्यांनी काही निबंध इंग्रजीत लिहिले. ते रिलीजन आणि धर्म या नावाने प्रसिद्ध झाले, त्यांचा स्वैर अनुवाद साने गुरुजी यांनी केला आणि तो राष्ट्रीय हिंदुधर्म या नावाने द. र. कोपर्डेकर यांनी 1940 साली प्रसिद्ध केला. पुस्तकात पंचवीस लेख असून आजच्या काळात सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहेत.
सुरुवातीच्या प्रकरणामध्ये हिंदुधर्माची श्रेष्ठता सांगताना भगिनी निवेदिता म्हणतात, हिंदू धर्मातील तत्त्वे दंतकथांवर कमी विसंबून आहेत. सत्यासाठी चालवलेली कोणतीही धडपड, सत्यासाठीचा प्रयोग हिंदू धर्म पवित्र मानतो, ज्ञानासाठी धडपडणारा धर्मवीर मानला जातो. ज्ञानासाठी केला जाणारा प्रत्येक प्रामाणिक व आंतरिक प्रयत्न हा हिंदू धर्मात पूज्य मानला जातो, त्या प्रयत्नांना उत्तेजन देण्यात येते.कोणत्याही रूपाने कोणत्याही मार्गाने सत्य येवो हिंदू धर्माला त्याची चीड नाही. हिंदू धर्मातील हीच परमश्रेष्ठ वस्तू असावी, हिंदू धर्माची हीच दृष्टी हा खरा अलंकार असेल. गॅलिलिओ भारतात अवतरला असता तर त्याचा छळ झाला नसता. एकूण हिंदू धर्म कधीही रानवट, दांडगड बनला नाही. ज्ञानाशी, शिक्षणाशी त्याचा विरोध नव्हता ज्ञान पवित्र व पूज्य आहे, संग्राह्य आहे असे हिंदू धर्म मानतो. या विचारांचा आज गांभीर्याने विचार व्हायला हवा.
राष्ट्रीय धर्म म्हणून कार्य करायला पाहिजे हे त्या परखडपणे सांगतात. त्या म्हणतात, `ख्रिस्तधर्म विज्ञानाला पचवू शकला नाही. विज्ञानाची गोळी गिळणे ख्रिस्तीधर्माला जड गेले. हिंदू धर्माला अर्वाचीन संस्कृती पचवून टाकण्याची शक्ती आहे. कारण हिंदू धर्मातील शेकडो आचार व रूढी, नाना प्रकारच्या चाली व समजुती यांच्या पाठीमागे आकाशास जाऊन पोचणाऱया अशा अद्वैताच्या भिंती आहेत आणि अद्वैत तत्त्वज्ञान सर्वांना कवटाळणारे आहे.’ हिंदूधर्मीयांना महत्त्वाचा असा उपदेश करताना त्या सांगतात, `हिंदू धर्म म्हणजे भारतमातेची सेवा. जुन्यापुराण्या गोष्टींची पूजा करण्याऐवजी सामुदायिक जीवनाची पूजा आरंभावी. धार्मिक व्रत वैकल्ये व नाना पूजा प्रचार यांच्याऐवजी ज्ञान,सहकार्य, संघटना यांच्यासाठी कंबर कसायची. नवीन व्रते, नवीन ध्येये पुजू लागलो म्हणून हिंदू धर्माचा पाया पोखरला जाणार नाही. संध्याकाळी देवदर्शनाऐवजी मजुरांसाठी वर्ग चालवावा. यज्ञकुंडे, अग्निहोत्र शाळा व होमशाळा बांधण्याऐवजी कारखाने, विद्यापीठे, दवाखाने बांधावेत. देवाला पंच महानैवेद्य व नाना भोग अर्पण करण्याऐवजी दीनांच्या पोटातील भूकअग्नि शांत करावा. उपवासापेक्षा अध्ययन, नवीन ज्ञानार्थ धडपड यांना अधिक महत्त्व द्यावे. गरीबांची सेवा, सहकार्य व बंधुभाव याहून थोर दुसरी पूजा नाही. एकूण भूदेवांचे गुलाम होण्याऐवजी भारतमातेचे बंदे सेवक व्हावे असे त्या सुचवतात. भारताने प्राचीन काळापासून संकुचित नीतीला कधी प्राधान्य दिले नाही. भारतीय ध्येय वा नीति विशिष्ट जातीपुरती कधीच नव्हती.भारतवर्षाचा हा उज्ज्वल व थोर विशेष आज आपण लक्षात घ्यावा असा आहे.
पाश्चात्यांमध्ये पंगूपणाचे परावलंबनाचे निष्कियत्वाचे व परामशून्यतेचे शिक्षण देण्यात येत नाही. शेळी मेंढीसारखा न होता सामर्थ्यवान निर्भय सिंह हो, असे त्याला सांगण्यात येते, ते भारतीयांनी स्वीकारावे असे आडवळणाने सुचवून हिंदू धर्म विकासवादी व उपांतिवादी आहे, जुन्या चालीरीती, जुने आचारविचार ह्यांच्यावर हल्ले चढवा, असे त्या सांगतात. संस्कृति म्हणजे सहानुभूमि. कुणाचाही हेवादावा, द्वेष, मत्सर न करणे अशुभ व अकल्याण न चिंतणे, त्याला जर मदत देता आली तर देणे ह्याला संस्कृती म्हणतात. युरोपमधील ग्रीक व रोमन लोकांच्या व राजांची संस्कृती म्हणजेच जागतिक संस्कृती असे पाश्चिमात्य सांगतात त्यांना भारतीय, चिनी व इस्लामी संस्कृतीचा विसर पडतो, याचा त्या उद्वेगाने उल्लेख करतात.
ज्ञान कर्मात प्रकट झाले पाहिजे म्हणजे त्यालाच सद्गुण म्हणतात.पोटिस ज्ञानाची व्याख्या अशीच करीत असे. भारताचे प्राचीन भांडार प्रंचड आहे. आपण बलशाही व्हायचे असेल तर आजच्या युगात आपण आपले तत्त्वज्ञान यशस्वी करून दाखवले पाहिजे. विज्ञानाच्या मैदानावर जाऊन तिथे भारतीय तत्त्वज्ञान विजयी व्हायला पाहिजे. प्रत्येक कर्म ईश्वराचा साक्षात्कार करून देणारे आहे. प्राचीन विद्येइतकीच अर्वाचीन विद्या पवित्र आहे. प्रयोगशाळा पूज्य व पावन आहेत. प्राचीन भारताचा इतिहास जितका आध्यामिक व दिव्य तितकाच आजचाही आहे, यावर विश्वास ठेवा, असे त्या सांगतात.
एकूण हिंदू धर्म अत्यंत विकासक्षम आहे आणि त्यातील जुन्या चालीरीती, आचारविचार यावर हल्ले चढवताना शरम वाटायचा नको, नवे चांगले ते स्वीकारा. कोणतेही सेवाकर्म म्हणजे धर्मच होय हे भगिनी निवेदना यांनी शंभर वर्षांपूर्वी व्यक्त केलेले विचार साने गुरुजी यांनी आपल्यापर्यंत आणले ते आजच्या काळात खूप महत्त्वाचे आहेत.
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)




























































