
गोरेगाव पश्चिमेला भटक्या श्वानांनी अक्षरशः हैदोस घातला असून गेल्या काही दिवसांत 20 ते 25 जणांना चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अंगावर झेप घेऊन अनेकांच्या चेहऱयाचे लचके तोडले आहेत. त्यामुळे शाळकरी मुलांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये घबराट पसरली असून या श्वानांचा वेळीच बंदोबस्त करा, अशी मागणी शिवसेनेसह स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
गोरेगाव पश्चिमेकडील सिद्धार्थ नगर, मोतीलाल नगर, जवाहर नगर अशा विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून मोकाट श्वानांनी उच्छाद मांडला आहे. रस्त्याने चालणाऱया नागरिकांवर श्वानांकडून खुलेआम हल्ला होत आहे. पिसाळलेल्या श्वानाने सिद्धार्थ नगर परिसरात गेल्या काही दिवसांत 20 ते 25 नागरिकांना चावा घेतला आहे. यात पाच वर्षीय चिमुकल्याचादेखील समावेश आहे. गुरुवारी एका दिवसात 11 जणांना चावा घेतला आहे. या परिसरात शाळा-कॉलेज असल्यामुळे शाळकरी मुलांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. श्वानांच्या दहशतीमुळे मार्ंनग वॉकसाठी येणाऱयांची संख्या घटली आहे. रात्री-अपरात्री रस्त्यावरून एकटे फिरणेही मुश्कील झाले आहे.
…अन्यथा पालिकेवर आंदोलन करू
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे विधानसभा संघटक, माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनी पी दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना पत्र पाठवत या भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. तसेच या श्वानांना पकडण्यात पालिकेला अपयश येत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. सर्वसामान्य नागरिकांसह शाळकरी मुलांचा जीव धोक्यात घालणाऱया या श्वानांचा वेळीच बंदोबस्त करा अन्यथा पालिकेवर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिलीप शिंदे यांनी दिला.




























































