
राज्यात जेथे शाळा तेथे शिक्षक उपलब्ध करुन दिले जाणार असून एकही शाळा शिक्षकाविना राहणार नाही, अशी ग्वाही शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिली. आमदार किरण सरनाईक यांनी अनेक शाळांमध्ये संचमान्यतेमुळे शिक्षक उपलब्ध होणार नाहीत याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
सध्या राज्यात सुरू असलेली विकास कामे, उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्या सोयी सुविधा यामुळे दुर्गम, डोंगरी किंवा नागरी भाग असा फरक राहिलेला नसून कोणतीही शाळा पटसंख्येअभावी शिक्षकाविना राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल, असे भोयर यांनी सांगितले.
शिक्षकेतर कामे सुशिक्षित बेरोजगारांना देण्याचा विचार
राज्यात शिक्षकांना शिक्षणाव्यतिरिक्त अन्य कामे देण्यात येऊ नयेत, अशी मागणी शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केली होती. त्यावर शिक्षकांना शिक्षणाव्यतिरिक्त इतर कामे तसेच निवडणुकीची कामे न देता ती कामे सुशिक्षित बेरोजगारांना देण्याबाबत प्राधान्याने विचार केला जाईल असे पंकज भोयर यांनी सांगितले.




























































