आटगाव स्थानकात पुलाचा सांगाडा कोसळला, महाकाय लोखंडी खांबाखाली दोघे चिरडले एका कामगाराचा मृत्यू

मध्य रेल्वे मार्गावरील आटगाव रेल्वे स्थानकात शुक्रवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. जीर्ण झालेल्या पुलाचे पाडकाम सुरू असतानाच या पुलाचा सांगाडा पत्त्यासारखा कोसळला. त्यामुळे सर्व कामगार जीवाच्या आकांताने आजूबाजूला पळाले. मात्र एका भल्या मोठ्या लोखंडी खांबाखाली दोन कामगार चिरडले. यातील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

आटगाव रेल्वे स्थानकात दोन नवीन पूल उभारण्यात आले आहेत. या नवीन पुलाच्या बाजूलाच एक जीर्ण पूल असून त्याचा काही भाग वर्षभरापूर्वीच पाडण्यात आला होता. प्लॅटफॉर्म क्रमांक एक व दोनच्या मध्ये असलेला हा लोखंडी पुलाचा अर्धा भाग अखेरची घटका मोजत होता. त्याचा धोका वाढल्याने दुर्घटना घडण्याची भीती होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने उर्वरित भागदेखील तोडण्यासाठी कंत्राटदाराला सांगितले होते. त्यानुसार शुक्रवारी रात्री या पुलाचे पाडकाम सुरू होते, परंतु हे काम करत असताना ही दुर्घटना घडली.

अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती

जीर्ण पुलाचा सांगाडा कोसळला त्यावेळी मुंबईकडे किंवा कसाऱ्याच्या दिशेने जाणारी एकही लोकल अथवा मेल, एक्स्प्रेस जात नव्हती. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. वास्तविक हे काम ब्लॉक घेऊन करणे गरजेचे होते असे मत प्रवाशांनी व्यक्त केले आहे.

रेल्वे पोलीस, आरपीएफ, बचाव पथक घटनास्थळी

जीर्ण पुलाच्या सांगाड्याखाली दोन कामगार दबल्याची माहिती रेल्वे प्रशासनाला कळताच युद्धपातळीवर बचावकार्य करण्यात आले. रेल्वे पोलीस, आरपीएफ, बचाव पथक, आपत्ती व्यवस्थापन टीम तसेच शहापूर, कसारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र लोखंडी खांबाखाली दबल्याने पवनकुमार सिंग (रा. हरियाणा) याचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक कामगार जखमी झाला असून त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.