सासऱ्याच्या एका मतामुळे सून बनली सरपंच!

मतदान हे लोकशाहीला बळकट करण्यासाठी आणि ते आपले नागरी कर्तव्य आहे, याचा प्रत्यय नुकताच तेलंगणातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आला आहे. तेलंगणाच्या निर्मल जिह्यातील लोकेश्वरम मंडल येथील ग्रामपंचायत बागापूरसाठी मतदान पार पडले. या निवडणुकीत सूनबाई उभ्या होत्या. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सासरे थेट अमेरिकेतून गावात आले. त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आणि अवघ्या एका मतामुळे सूनबाई थेट सरपंच झाल्या. मुत्याला श्रीवेधा असे सरपंच झालेल्या महिलेचे नाव आहे. मुत्याला श्रीवेधा यांचे सासरे इंद्रकरण रेड्डी हे अमेरिकेतून मतदान करण्यासाठी गावाला आले होते. मतमोजणी झाली त्या वेळी 426 मतदानांपैकी 378 लोकांनी मतदानाचा हक्क बजावला.

श्रीवेधा यांना 189 मतदान मिळाले, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला 188 मते मिळाली. याचाच अर्थ श्रीवेधा या केवळ एका मताच्या फरकाने विजयी झाल्या. श्रीवेधा यांचे सासरे अमेरिकेहून मतदानासाठी आले नसते तर दोन्ही उमेदवारांना समान मतदान मिळाले असते. अवघ्या एका मतामुळे विजय मिळाल्याने या निवडणुकीची आजूबाजूच्या गावात जोरदार चर्चा रंगली आहे. अवघ्या एका मतामुळे काय होऊ शकते, याचा प्रत्यय लोकांना आला आहे.