पंकजा मुंडेंच्या पीएच्या बहीण, भावाला जामीन; अनंत गर्जेची पुन्हा पोलीस कोठडीत रवानगी

भाजपच्या पॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या गर्जेची पुन्हा पोलीस कोठडीत सत्र न्यायालयाने रवानगी केली आहे. त्याचबरोबर गर्जे यांची बहीण शीतल व भाऊ अजय या दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे.

पंकजा मुंडेंचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे यांनी त्यांच्या राहत्या घरात आत्महत्या केली. याप्रकरणी त्यांच्या पतीला अटक करण्यात आली तर त्यांची बहीण शीतल गर्जे-आंधळे व भाऊ अजय गर्जे यांच्या विरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून बहीण-भाऊ दोघेही फरार आहेत. दरम्यान या दोघांच्या वतीने मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अॅड. मंगेश देशमुख यांच्यामार्फत अर्ज करण्यात आला. या अर्जावर सत्र न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश रूपाली पवार यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. या अर्जांवर गेल्या आठवडय़ात सुनावणी पूर्ण करत न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. आज सोमवारी राखून ठेवलेला निकाल न्यायाधीशांनी जाहीर करत दोघांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.