धक्कादायक! चिपळुणात शिलाई मशिनचे आमिष दाखवून 424 महिलांची फसवणूक

सरकारी योजनेतून शिलाई मशिन देण्यात येणार असल्याचे सांगून तालुक्यातील 424 महिलांकडून प्रत्येकी 600 ते 1700 रुपये प्रमाणे एकूण 3 लाख 65 हजार 970 रुपये उकळण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पैसे घेऊनही अनेक महिने उलटून गेले तरी शिलाई मशिन न मिळाल्याने संतप्त महिलांनी सोमवारी चिपळूण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

या प्रकरणी सुभाष सकपाळ (रा. देवघर, ता. गुहागर) या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. मनिषा संतोष खेडेकर, श्रेया शंकर पाटेकर, रुचिता रणजित कदम, स्वरा स्वप्निल घारे, रिया राजेंद्र देवळेकर यांच्यासह अनेक महिलांनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, सुभाष सकपाळ याने चिपळूण तालुक्यातील महिलांना सरकारी योजनेखाली शिलाई मशिन मिळेल, असे सांगून नोंदणी व प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली पैसे घेतले. वीस ते पंचवीस दिवसांत मशिन मिळेल, असे आश्वासनही देण्यात आले. मात्र, कालावधी उलटून गेला तरी कोणत्याही महिलेला शिलाई मशिन देण्यात आले नाही. याबाबत विचारणा केल्यावर सकपाळ याच्याकडून टाळाटाळीची उत्तरे दिली जात होती, असा आरोप महिलांनी केला आहे.

फसवणुकीचा संशय बळावल्याने संतप्त महिलांनी मुंबई–गोवा महामार्गावरील शिवाजीनगर बसस्थानक परिसरातील एका खासगी कार्यालयावर धडक दिली. यावेळी महिलांनी सकपाळ याला जाब विचारत तीव्र संताप व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सकपाळ याला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी सुरू केली. त्यानंतर सर्व महिला पोलीस ठाण्यात दाखल झाल्या.

विशेष म्हणजे, या प्रकरणातील बहुतांश महिला सर्वसामान्य व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील आहेत. दरम्यान, या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता असून संबंधित सरकारी योजना नेमकी कोणती होती, जमा केलेली रक्कम कुठे वापरण्यात आली आणि या प्रकारात आणखी कोणी सहभागी आहे का, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.