
बाप हा बापच असतो आणि तो आपल्या लेकरांसाठी काहीही करायला मागे पुढे पाहत नाही. इतिहासामध्ये याचे अनेक दाखले आपल्याला मिळतात. आताही गुजरातमधील अहमदाबाद येथे याचा प्रत्यय आला आहे. येथे बोरवेलमध्ये पडलेल्या मुलीला वाचवण्यासाठी वडिलांनी थेट आत उडी घेतली. मात्र पाणी जास्त असल्याने दोघांनाही बाहेर पडता आले नाही. अखेर स्थानिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी दोघांनाही सुरक्षित बाहेर काढले. याचा व्हिडीओही समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद जिल्ह्यातील चांदलोडिया येथील गजराज सोसायटीतील जैन देरासर परिसरात 60 फूट खोल बोरवेलमध्ये माळीचे काम करणाऱ्या कुटुंबातील एक मुलगी पडली. मुलगी बोरवेलमध्ये पडल्याची माहिती मिळताच वडिलांनी मागचा पुढचा विचार न करता तिला वाचवण्यासाठी थेट बोरवेलमध्ये उडी घेतली.
सुरुवातीला बाप-लेकीला वाचवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी प्रयत्न केला. मात्र जवळपास अर्धा तास प्रयत्न करूनही त्यांना यश आले नाही. त्यानंतर स्थानिकांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली. अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले.
बाप तो बापच… पोरीला वाचवण्यासाठी वडिलांनी 60 फूट खोल बोरवेलमध्ये घेतली उडी, बचावाचा थरार कॅमेऱ्यात कैद pic.twitter.com/slUz7Nw3x3
— Saamana Online (@SaamanaOnline) December 16, 2025
सदर बोरवेल 5 फूट रुंद आणि 60 फूट खोल होता. बाप-लेकीला वाचवण्यासाठी अग्निशमन दलाने दोरखंड आणि इतर आवश्यक साधन सामग्री मागवली आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. अग्निशमन दलाचा एक जवान बोरवेलमध्ये दोरखंड घेऊन उतरला आणि एक-एक करून दोघांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
दोघांनाही प्राथमिक उपचारांसाठी रुग्णवाहिकेद्वारे सोला सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची सर्व माहिती स्थानिक पोलिसांनाही देण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

























































