
कश्मीर खोऱयात बर्फवृष्टी होत नसल्याने पर्यटकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. कश्मीर फिरायला जाणाऱ्या पर्यटकांना बर्फवृष्टी हवी आहे. सध्या येथील हवामान कोरडे आहे. त्यामुळे पर्यटक इकडे फिरकले नाहीत. पर्यटकांची संख्या खूपच कमी असल्याने पर्यटन उद्योगावर याचा परिणाम जाणवत आहे. तसेच या वर्षी एप्रिलमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे कमी झालेली पर्यटक संख्या अद्याप वाढलेली नाही.
कश्मीर खोऱयात डिसेंबरच्या महिन्यात बर्फवृष्टी होते. त्यामुळे देश-विदेशातील लोक खोऱयात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी कश्मीर खोऱयात येतात. सध्या पर्यटन स्थळी असलेल्या हॉटेलमध्ये पर्यटकांची बुकिंग कमी आहे, अशी माहिती जम्मू-कश्मीर हॉटेलियर्स क्लबचे अध्यक्ष मुश्ताक चाया यांनी दिली. गुलमर्ग, पहलगाम आणि सोनमर्ग या ठिकाणी बर्फवृष्टी न झाल्याने पर्यटकांची बुकिंग कमी झाली आहे, असे ते म्हणाले. बर्फवृष्टी झाल्यानंतर कश्मीर खोऱयात पर्यटकांची संख्या वाढू शकते, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. कश्मीरमध्ये विंटर टुरिजम थेट बर्फवृष्टीशी जोडलेला आहे.
प्लान झाला, कन्फर्मेशन बाकी
ट्रव्हल एजंट्सकडे चौकशी केली जात आहे, परंतु पर्यटकांकडून कन्फर्मेशन होत नाही. पर्यटकांना बर्फवृष्टी हवी आहे, असे ट्रव्हल एजंट्स असोसिएशन ऑफ कश्मीरचे अध्यक्ष रऊफ त्रबू यांनी सांगितले. कश्मीर फिरण्यासाठी पर्यटक उत्सुक आहेत. त्यांचा प्लान झाला आहे, परंतु ते केवळ आता बर्फवृष्टीची वाट बघत आहेत. बर्फवृष्टी झाल्यानंतर पर्यटकांची संख्या निश्चित वाढेल, असेही रऊफ त्रबू म्हणाले.
थर्टी फर्स्टची विचारणा
ख्रिसमस आणि थर्टी फर्स्टची विचारणा अनेक पर्यटकांकडून केली जात आहे, परंतु पर्यटकांकडून बुकिंग म्हणावी तशी केली जात नाही. पर्यटकांच्या आणि आमच्या नजरासुद्धा आता बर्फवृष्टीवर टिकल्या आहेत. एकदा बर्फवृष्टी झाली की, गुलमर्गमध्ये पर्यटकांची गर्दी पाहायला मिळेल, असे गुलमर्ग येथील एका हॉटेल व्यावसायिकाने सांगितले.




























































