
खंडणीला विरोध केला म्हणूनच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून अमानुष हत्या करण्यात आली. अन्याय होताना लोक बघ्याची भूमिका घेतात. परंतु संतोष देशमुख त्याविरोधात ठामपणे उभे राहिले. अशा व्यक्तीची हत्या होणार असेल तर अन्यायाच्या विरोधात कोण उभे राहील? असा सवाल करत सरकारी वकील अॅड. अमरजितसिंह गिरासे यांनी वाल्मीक कराडच्या जामिनाला कडाडून विरोध केला. या प्रकरणी बुधवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराड याने जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. या प्रकरणात काल सरकारी वकील अॅड. अमरजितसिंह गिरासे यांनी कराड हाच हत्याकांडाचा प्रमुख सूत्रधार असल्याचे पुराव्यानिशी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले होते. आजही या प्रकरणाची न्या. एस. एम. घोडेस्वार यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी सरकार पक्षाच्या वतीने युक्तिवाद करताना अॅड. गिरासे यांनी संतोष देशमुख यांनी त्यांना येत असलेल्या धमक्यांची मुलगी वैष्णवी हिला फोनवरून कल्पना दिली होती. माझे बरेवाईट झाल्यास घराची, कुटुंबाची काळजी घे असेही ते म्हणाले होते. त्यावर वैष्णवीने तुम्ही स्वतःसाठी नव्हे तर गावासाठी काम करत आहात असे त्यांना सांगितले होते. अन्याय होताना लोक बघ्याची भूमिका घेतात. परंतु संतोष देशमुखांनी त्याविरोधात आवाज उठवला. खंडणीला विरोध केला म्हणूनच त्यांची हत्या झाली. अन्यायाविरोधात उभे राहणाऱ्यांची अशी निर्दयपणे हत्या होणार असेल तर कोण अन्यायाविरोधात उभे राहील, असा सवालही त्यांनी केला.
अटक बेकायदेशीर नाही; वकिलांचा दावा
वाल्मीक कराडला या प्रकरणात 31 डिसेंबर 2024 रोजी अटक करण्यात आली. त्याच दिवशी त्याला लेखी कारणे देण्यात आली होती. त्या कागदपत्रांवर त्याची तसेच प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांची स्वाक्षरीही आहे, असे ऍड. अमरजितसिंह गिरासे यांनी पुराव्यानिशी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. आरोपीला लेखी कारणे देणे बंधनकारक असल्याचा मिहिर शहा प्रकरणाचा निवाडा 6 नोव्हेंबर 2025 नंतरच्या प्रकरणांना लागू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कराडची अटक बेकायदेशीर नसल्याचे अॅड. गिरासे यांनी ठणकावून सांगितले. वाल्मीक कराडला लावण्यात आलेला मकोकाही कायद्यानुसारच असल्याचे ते म्हणाले. वाल्मीक कराड हाच हत्याकांडाचा सूत्रधार असून तो इतर आरोपींच्या सातत्याने संपर्कात होता याकडेही त्यांनी लक्ष वेधले.































































