
उरण शहरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी आठ वर्षांपूर्वी बायपासचे काम सुरू करण्यात आले. यातील सिडकोच्या अखत्यारित असलेल्या साधारण 941 मीटर लांबीच्या रस्त्याचे काम सुरू असून नवीन वर्षात ते तडीस लागणार आहे. मात्र असे असले तरी पुढील जवळपास 400 मीटर लांबीचा मार्ग नगर परिषद करणार आहे. परंतु यासाठी लागणारा 12 कोटींचा निधी खर्च करायला पालिकेकडे पैसेच नाहीत. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होणार असले तरी पुढच्या मार्गाची रखडपट्टी कायम राहणार असल्याने वाहतूककोंडीचे शुक्लकाष्ठ आणखी काही वर्षे राहणार आहे. केवळ 12 कोटींच्या निधीसाठी 62 कोटींचा हा बायपास अजून किती वर्षे लटकणार, असा सवाल उरणकरांनी केला आहे.
उरण शहरातील वाहतूककोंडीचा ताण हलका करण्यासाठी उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर उरण सिडकोने बायपास तयार करण्याची योजना आखली. सिडकोने द्रोणागिरी नोडमधील आनंदी हॉटेल ते उरण शहरातील कोर्टपर्यंतचा बायपास रस्ता तयार करण्याचे काम सुरू केले. या 1 हजार ३41 मीटर लांबीच्या रस्त्यापैकी 400 मीटर लांबीचा रस्ता उरण नगर परिषदेच्या अखत्यारित येत आहे. उर्वरित 941 मीटर लांबीचा बायपास रस्ता सिडकोमार्फत बांधण्यात येत आहे. यामध्ये 6.40.425 मीटर लांबीचा पूल व 153.004 लांबीच्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यासह 148.071 लांबीच्या रिटेनिंग वॉलचा समावेश आहे. मागील सात-आठ वर्षांपासून सुरू असलेल्या पुलाचे काम 85 टक्के पूर्ण झाले आहे. सिडकोच्या अखत्यारित असलेले उरण बायपास रस्त्याचे काम 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे. हा बायपास रस्ता, पूल कार्यान्वित झाल्यानंतर उरण शहरातील जनतेचा वाहतूककोंडीचा प्रश्न निकाली निघेल, असा विश्वास सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रियांका रातांबे यांनी व्यक्त केला..”
ढिसाळ कारभाराविरोधात संताप
सिडकोच्या अखत्यारितील 941 मीटर लांबीचा पूल व बायपास रस्ता पूर्ण झाला तरी जोपर्यंत उरण नगर परिषदेच्या अखत्यारित येणारा 400 मीटर लांबीचा रस्ता तयार होणार नाही तोपर्यंत बायपास रस्त्यावरून वाहतूक सुरू होणार नाही. उरण बायपास केवळ 12 कोटींच्या निधीअभावी रखडला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.




























































