
जवळे कडलग येथे बिबटय़ाच्या हल्ल्यामध्ये मयत झालेल्या सिद्धेश सूरज कडलग यांच्या कुटुंबीयांना आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून 10 लाख रुपयांची मदत राज्य सरकारच्या वन विभागाच्या वतीने देण्यात आली असून, सकाळी आंदोलनात दिलेला शब्द आमदार तांबे यांनी कृतीसह पाठपुराव्यातून 6 तासांत पूर्ण केला.
13 डिसेंबर 2025 रोजी जवळे कडलग येथील चार वर्षीय सिद्धेश सूरज कडलग याचा बिबटय़ाच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला. संगमनेर तालुक्यामध्ये बिबटय़ांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली असून, या बिबटय़ांचा तातडीने बंदोबस्त करावा, ही मागणी वारंवार होत आहे.
याकरता आमदार सत्यजित तांबे डॉ. जयश्री थोरात यांच्या पुढाकारातून संगमनेरमध्ये भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. या मोर्चामध्ये सिद्धेश कडलग याचे वडील सूरज कडलगसुद्धा सहभागी झाले होते. यावेळी कडलग कुटुंबीयांना सरकारने तातडीची मदत करावी, अशी मागणी करण्यात आली होती. यानंतर आमदार तांबे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना फोन करून सिद्धेश कडलग यांच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली. त्यानंतर काल (दि. 15) उपवनसंरक्षक, अहिल्यानगर यांच्या कार्यालयामार्फत तातडीने 10 लाख रुपयांची मदत दिली आहे.
दरम्यान, संगमनेर तालुक्यात बिबट्यांचे हल्ले सातत्याने वाढत असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत प्रभावी उपाययोजना करावी, याकरिता काँगेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना विनंती केली.





























































