जागतिक रोबोटिक्स चॅम्पियनशिपवर हिंदुस्थानचा झेंडा, अहिल्यानगरची दिया छाजेड, ईशिका अडसूळ ठरल्या अव्वल

उत्तर युरोपातील एस्टोनिया देशात झालेल्या ‘जागतिक रोबोटिक्स चॅम्पियनशिप’ स्पर्धेत हिंदुस्थानातील अहिल्यानगर शहरातील दिया छाजेड, ईशिका अडसूळ यांनी प्रथम क्रमांक मिळवून हिंदुस्थानचा तिरंगा उंचावला. या स्पर्धेत 70 देशांतील दोन हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

यापूर्वी हिंदुस्थानात झालेल्या राष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत दियाने यश मिळविले होते. पुणे जिह्यातील लोणी काळभोर येथील एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठात झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने अव्वल स्थान पटकावीत आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळविली होती. तिच्यासोबत ईशिका अडसूळ हिनेही राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली होती.

एस्टोनिया येथे झालेल्या या जागतिक स्पर्धेत 10 विविध कॅटेगिरींमध्ये सर्व वयोगटांतील स्पर्धक सहभागी झाले होते. मात्र, नावीन्यपूर्ण कल्पना, अचूक सादरीकरण व आत्मविश्वासाच्या जोरावर दिया व ईशिका यांनी या प्रगत देशांच्या प्रमुख संघांनाही पराभूत करीत अव्वल स्थान पटकाविले.

शेतीसाठीचा रोबोट ठरला आकर्षण

दियाने तयार केलेला मोबाईलवर ऑपरेट होणारा शेतीसाठी उपयुक्त रोबोट हा स्पर्धेतील विशेष आकर्षण ठरला. हा रोबोट पेरणी, फवारणी व नांगरणी यांसारखी अनेक शेतकामे एकाच यंत्राद्वारे करू शकतो. त्यामुळे शेतकऱयांचा खर्च कमी होऊन कष्टही मोठय़ा प्रमाणात कमी होतात. तापमान, हवामानातील बदल व वातावरणातील आर्द्रता मोजण्याची क्षमताही या रोबोटमध्ये आहे.

शेतकऱयांचे कष्ट कमी करून कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळेल, या उद्देशानेच मी हा रोबोट तयार केला. – दिया छाजेड