
रायगड जिल्हा रुग्णालय इमारतीच्या कामाला अखेर नऊ महिन्यांनंतर मुहूर्त मिळाला आहे. इमारत उभारण्यासाठी आवश्यक ड्रिलिंग करण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र असे असले तरी येथे असलेली रक्तपेढी हलविण्यास एफडीआयची परवानगी मिळालेली नाही. तसेच ऑक्सिजन प्लांट अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यास विलंब लागणार असल्याने इमारत उभारणीच्या कामात विघ्न कायम आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाची इमारती उभी राहणार कधी, असा सवाल नागरिकांनी केला आहे.
जिल्हा रुग्णालयासाठी नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. जिल्हा रुग्णालय इमारत ज्या जागेत बांधली जाणार आहे त्या जागेत ऑक्सिजन प्लांट व रक्तपेढीची इमारत आहे. सदर ऑक्सिजन प्लांट व रक्तपेढी अन्य ठिकाणी स्थलांतरित करणे आवश्यक आहे. सध्या सुरू असलेल्या रुग्णालयातील लहान मुलांच्या कक्षात रक्तपेढी हलविण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी एफडीएची परवानगी मिळाली नसल्याचे दिसून येते. तसेच ऑक्सिजन प्लांट हलविण्यासाठी अद्याप आश्वासक पावले उचलण्यात आली नाही. यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या नूतन इमारतीच्या मार्गात अद्यापही रक्तपेढी व ऑक्सिजन प्लांटचे विघ्न कायम राहिले आहे.
जिल्हा रुग्णालय नूतन इमारत ज्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. त्या ठिकाणी असणारी रक्तपेढी स्थलांतरित करण्याच्या दृष्टीने काम हाती घेण्यात आले आहे. रक्तपेढी स्थलांतरित करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच पुढील काही दिवसात येथील ऑक्सिजन प्लांट स्थलांतरित केले जाईल. – डॉ. शीतल जोशी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक





























































