आभाळमाया – अवकाशी अफवा विरल्या

>> वैश्विक

तीन आय ऍटलास धूमकेतू सूर्यमालेत शिरतो काय नि त्याविषयी अफवांचे अवकाशी पीक येते काय! विज्ञान जाणणं ही प्रक्रिया अशा अफवा अधिक कठीण करून ठेवतात. केवळ कंठाळी वृत्तांसाठी सत्याची मोडतोड करण्यात कसलं आलंय रंजन? विज्ञानही सहज सोप्या शब्दांत जनसामान्यांना कळावे असं मांडणं हेच उद्दिष्ट हवं, पण ‘आम्ही पहिले भाष्यकार’ होण्याच्या बाष्कळ स्पर्धेची पुष्कळ पैदास झाल्याने अवकाशात काय किंवा भूगर्भातील उत्खननात काय नवीन काही आढळलं की, कुतर्कमालिका सुरू. यात ते विज्ञान जाणणाऱ्यांना कोणी मत विचारत नाही. विचारलं तरी ते ‘मसालेदार’ वृत्तप्रसारणाला अनुकूल नसेल तर लक्षातही घेतलं जात नाही. सिनेमा किंवा राजकारणी बातम्यांना लावले जाणारे ‘सूत्रां’चे निकष बहुधा याबाबतीतही वापरले जात असावेत.

…तर तीन आय ऍटलास नावाचा एक छान धूमकेतू त्याच्या हायपरबॉलिक म्हणजे अपास्तिक कक्षेत किंवा न परतीच्या फिरता-फिरता आपल्या सौरमालेच्या भेटीला येतोय हे 1 जुलै 2025 रोजी ‘ऍस्टेरॉइड टेरेस्ट्रिअल इम्पॅक्ट लास्ट ऍलर्ट सिस्टम’ म्हणजेच ऍटलास संस्थेच्या लक्षात आलं. आंतरतारकीय क्षेत्रातून येणारा हा तिसरा धूमकेतू त्याला तीन आय (तिसरा इन्टरस्टेलर) असं नावं मिळालं. त्यापूर्वी आलेल्या आंतरतारकीय धूमकेतूंची नावे क्रमाने औमुआमुया आणि बोरिसॉव्ह अशी होती. त्यानंतर आलेला ‘ऍटलास’ एक सुंदर धूमकेतू 29 ऑक्टोबरला पृथ्वीच्या सर्वात जवळून म्हणजे सुमारे 17 ते 18 कोटी किलोमीटर अंतरावरून पसार झाला. मुळात त्या वेळी तो सूर्याच्या सर्वाधिक नजीक असल्याने आपोआपच पृथ्वीच्याही जवळ होता, परंतु ही जवळीक सूर्य-पृथ्वी अंतराच्या सवापट असल्याने पृथ्वीला काहीही धोका नव्हता.

तरीसुद्धा ऍटलासचे रूप, रंग आणि ढंग यांची बरीच अवैज्ञानिक चर्चा झाली. असले वायफळांचे मळे हल्ली फार फुलवले जातात. हा धूमकेतूच नव्हे. ते परताऱ्याच्या एखाद्या ग्रहावरून आलेलं यान असून पृथ्वीचा नाश करायला आलंय. त्याच्या गाभ्याची स्वतःभोवती फिरण्याची गती खूप आहे वगैरे गोष्टींची चर्चा रंगली ती अशी स्वयंभू कथानकं मांडणाऱ्यांकडून. बरं, त्याला विज्ञानकथा किंवा सायन्स फिक्शन म्हणावं तर त्यात विज्ञानाचा किमान धागा (जर्म) तरी हवा ना. तोही नाही.

शेवटी ऍटलास आला तसा कोणताही उत्पात न करता आपल्या कक्षेत मार्गक्रमण करता झाला. तरी वैज्ञानिक सांगत होते की, या अवकाशीय ‘वस्तू’मध्ये आगळंवेगळं काहीच नाही. एरवीही प्रत्येक धूमकेतू आपल्या वैशिष्टय़ांसहच येत असतो. कधी त्याचा पिसारा मोठा दिसतो, तर कधी लहान. हे सारं त्यातील द्रव्यावर आणि त्याच्या सूर्याच्या किती जवळ येणार त्या कक्षेवर ठरतं, पण मग बातमीत ‘गंमत’ कशी येणार? एक ‘ऍटलास’ नावाच्या धूमकेतू येणार आणि जाणार या वाक्याला काहीच ‘ग्लॅमर’ नाही. मग ते त्यात ‘मिसळायचं’ तर चर्चा आलीच. तीही अवास्तव झाली तरी बेहत्तर, पण त्यात ‘न्यूज व्हॅल्यू’ तर आहे.

वास्तविक, कोणत्याही वैज्ञानिक घटनेविषयी त्या-त्या क्षेत्रातले अभ्यासक नेमके काय म्हणतात ते महत्त्वाचे. विवेचक काहीही सांगतील, पण ज्या संशोधकांनी या धूमकेतूच्या आगमनाची संशोधनात्मक द्वाही फिरवली त्यांनी त्याला ‘भयंकर’ वगैरे ठरवलेलं नव्हतं. पृथ्वीच्या निर्मितीपूर्वीपासून म्हणजे सूर्याच्या निर्मितीनंतर आधी ग्रहमाला आणि त्यापाठोपाठ ‘उर्ट क्लाऊड’ ही धूमकेतूंची ‘वसाहत’ साकारल्यापासून धूमकेतू येतच आहेत. कोणे एकेकाळी त्यांचं आगमन आकस्मिक वाटायचं म्हणून ‘काय धूमकेतूसारखा आलास (किंवा आलीस)’ असे वाप्रचार होते.

आता धूमकेतूंचा ठावठिकाणा, त्यांच्या प्रवासाच्या कक्षेचा प्रकार, ते पुन्हा कधी येतील किंवा येणारच नाहीत याची निश्चिती. त्यांचं दुर्बिणीतून होणारं सखोल निरीक्षण हे सर्व अभ्यासकांना समजत असताना अवकाशी अफवांना काय अर्थ. कधी कधी यातून याविषयाची काहीच माहिती नसणारे अकारण धास्तावू शकतात. आधीच धूमकेतू, ग्रहणं, अशनी, अष्टग्रही वगैरे गोष्टीभोवती गैरसमजाचं वलय मोठं, त्यातच ‘सर्वनाशा’च्या वगैरे कल्पना काही भाकीतकारांकडून अथवा अगदी सिनेमांमधूनही प्रभावीपणे मांडल्या की, यासंदर्भात अनभिज्ञ असणाऱ्यांना त्या सत्य वाटू शकतात.

कोणत्याही चमत्कारी अफवेपेक्षा तर्क-कुतर्कापेक्षा अनेक वैज्ञानिक सत्य अधिक अचंबित करणारी किंवा अमेझिंग आहेत. त्याला अफवांची झिंग कशाला? त्याऐवजी धूमकेतू समजावून सांगता येतो. ‘उर्ट क्लाऊड’ची लक्षावधी धूमकेतूंची वसाहत कुठे आहे हे ‘ग्राफिक’च्या सहाय्याने समजवता येतं. आंतरतारकीय धूमकेतू म्हणजे काय याचाही अभ्यासू पण मनोरंजनात्मक वेध घेता येतो.

आमच्या आकाशदर्शन कार्यक्रमात कितीतरी गैरखगोलीय संकल्पनांविषयी खरी वैज्ञानिक माहिती दिली जाते. पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातलं पाणी ‘खाली’ का पडत नाहीत असेही प्रश्न असतात. विज्ञान जाणणाऱ्यांनी त्याला संयमाने उत्तरं द्यावी लागतात. गेली 40 वर्षे आम्ही ते काम करतोय. लोकांना दुर्बिणीतून ‘विश्वरूप’ दाखवतोय. 12 व्या शतकात आपल्या महाराष्ट्रातलेच खगोल अभ्यासक भास्कराचार्य हेच कार्य करत होते. तेव्हा अवकाशी अफवांपासून सावध राहिलं तरच वैज्ञानिक सत्य जाणून घेता येईल.