डिजिटल अटकेच्या नावाखाली फसवणूक करणारा अटकेत

डिजिटल अटकेची भीती दाखवून वृद्ध शिक्षक महिलेच्या फसवणूक प्रकरणी एकाला पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. गौरव बारोट असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.

तक्रारदार या निवृत्त शिक्षिका आहेत. फेब्रुवारी महिन्यात त्याना एका नंबरवरून फोन आला. त्याने तो ट्राय विभागातून बोलत असल्याचे भासवले. तसेच तुमचा मोबाईल दोन तासांत बंद होणार असल्याचे सांगितले. तेव्हा महिलेने त्याच्याकडे चौकशी केली. त्या नंबरवरून धमकावणारे मेसेज जात आहेत. त्यामुळे नंबर बंद केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे पोलिसातदेखील तक्रार केली जाणार असल्याची भीती दाखवली. काही वेळाने त्याना एका नंबरवरून पुन्हा पह्न आला. पह्न करणाऱ्याने त्याच्या विरोधात कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या भुलथापा मारल्या. त्या गुह्यात अटक केली जाणार असल्याची भीती दाखवली. त्यानंतर त्याना व्हॉट्सअपवर बनावट नोटरीची पीडीएफ फाईल पाठवली.

काही वेळाने त्याना व्हिडिओ कॉल केला. कोर्टात जज बसले आहेत. कोर्टाच्या जजने त्याना नाव विचारून बँक खात्याची माहिती घेतली. पोलीस कोठडी नको असल्यास 20 लाख द्यावे लागतील असे त्याना सांगितले. भीतीपोटी त्यांनी 20 लाख दिले. मात्र त्यानंतर आणखीन सात लाखांची मागणी करण्यात आल्याने त्यांनी यासंदर्भात पश्चिम प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास करून गुन्हेगारांना अटक केली.